‘धनुष्यबाण’ गेल्यास ठाकरे गटाचा प्लॅन B तयार, कसे मिळवणार नवीन चिन्ह
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यास किंवा गोठवल्यास काय करावे, याचा आराखडा तयार केला. ठाकरे गटाचा प्लॅन B तयार झाला आहे. नवीन चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे.
मुंबईः शिवसेना (Shivsena), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यांसंदर्भात सोमवारी महत्वाचा निर्णय होऊ शकतो. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण कोणाचा यासंदर्भात निर्णय होणार आहे. दुपारी 4 वाजेच्या सुमारास केंद्रीय निवडणूक आयोगात यासंदर्भात युक्तिवाद सुरू होणार असून आयोग आजच निर्णय देण्याची शक्यता आहे. कोणाकडे किती संख्याबळ, किती सदस्य यावर आधारित आयोगाचा निर्णय असू शकतो. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यास किंवा गोठवल्यास काय करावे, याचा आराखडा तयार केला. ठाकरे गटाचा प्लॅन B तयार झाला आहे. नवीन चिन्ह मिळवण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे. त्यानंतर चिन्हाचा निर्णय घेणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने मशाल चिन्ह घेतले होते. परंतु हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात होते. ते ठाकरे गटाचे अंतिम चिन्ह नव्हते. यामुळे धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे गटाचा दावा कायम आहे. हा दावा फेटाळला गेल्यास ठाकरे गट जनतेत जाऊन नवीन चिन्ह काय असावे, याची चाचपाणी करणार आहे. जनतेला व शिवसैनिकांकडून चिन्ह सुचवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जनतेतून आलेल्या चिन्हांपैकी एखादे चिन्ह घेतले जाणार आहे.
यापूर्वीच्या सुनावणीत काय? शिवसेना पक्षाच्या खटल्यात यापूर्वी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी महत्त्वाची मागणी केली. सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयीचा खटला सुरु आहे. त्याचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयीची सुनावणी घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाच्या वकिलांनी केली होती. तर सुप्रीम कोर्टाने अद्याप कुणालाही अपात्र ठरवलं नसल्याने शिवसेना चिन्हासंबंधी निर्णय घेण्यास हरकत नाही, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.तसेच शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी पक्ष प्रमुख पदाविषयी महत्त्वाचा युक्तिवाद केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी अवैधरित्या पक्षप्रमुख पद स्वतःकडे ठेवल्याचा दावा आयोगासमोर करण्यात आला.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहणार का? उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदतही पुर्ण होत आहे. यामुळे प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीची परवानगी उद्धव ठाकरे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी दिली तर आयोगाने ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल.प्रतिनिधी सभेच्या निवडणुकीसाठी परवानगी नाही मिळाली तर धनुष्यबाण आणि पक्षासंबंधी निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे यांची पक्ष प्रमुख पदाची मुदत वाढवून मिळण्याचीही शक्यता आहे. किंबहुना आजच्या सुनावणीत एकंदरीत पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, असेही म्हटले जात आहे.