Vidhan Parishad Election 2022 : भाजपकडून नव्यांना संधी, काँग्रेसचं सोशल इंजीनियरिंग, शिवसेनेचं ग्रामीणवर लक्ष, राष्ट्रवादीची यादी गुलदस्त्यात; आखाड्यात कोण कोण?
Vidhan Parishad Election 2022 : भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी भाजपने सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना उमेदवारी दिली नाही. या दोन्ही नेत्यांना संधी दिली नाही. त्याऐवजी उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) रणधुमाळीनंतर आता विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष वेधलं आहे. विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी विधान परिषदेच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने विधान परिषदेसाठी पाच नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने दोन नावे, तर शिवसेनेनेही दोन नावे जाहीर केली आहेत. मात्र, राष्ट्रवादीने आपली नावे अजून जाहीर केली नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या (BJP) पाचपैकी चार उमदेवारांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. उमा खापरे या उद्या उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. शिवसेनेचे आमशा पाडवी आणि सचिन अहिर यांनीही उमेदवारी अर्ज भरले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी अजून अर्ज भरले नाहीत. काँग्रेसचे आमदार उद्या अर्ज भरतील असं सांगितलं जातं. तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावेही उद्याच जाहीर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
भाजपने पाच उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यावेळी भाजपने सदाभाऊ खोत आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांना उमेदवारी दिली नाही. या दोन्ही नेत्यांना संधी दिली नाही. त्याऐवजी उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देण्यात आली आहे. उमा खापरे या पिंपरी चिंचवडमध्ये राहतात. त्या पिंपरी चिंचवडमध्ये त्या नगरसेविका होत्या. आता पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक असल्याने पालिकेचं गणित साधण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याचं सांगितलं जात आहे.
काँग्रेसची सोशल इंजीनियरिंग
काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. भाई जगताप हे पूर्वी विधान परिषद सदस्य होते. ते मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांना संधी देण्यात आली आहे. तर हंडोरे हे माजी सामाजिक न्याय मंत्री आहेत. गेल्या दोन टर्मपासून ते संसदीय राजकारणापासून दूर होते. हंडोरे हे काँग्रेसमधील मुंबईतील दलित नेते आहेत. पालिका निवडणूक असल्याने काँग्रेसने दलित आणि मराठा असं समीकरण साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवसेनेचा ग्रामीण कल
शिवसेनेने मात्र ग्रामीण आणि शहरी असं समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अहिर हे माजी मंत्री होते. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन शिवसेनेने वरळी मतदारसंघ अधिक मजबूत केला आहे. दुसरीकडे नंदूरबारचे शिवसेना जिल्हा प्रमुख आमशा पाडवी यांनाही शिवसेनेने उमेदवारी देऊन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केलं आहे. नंदूरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गडात जम बसवण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न आहे.
शिवसेनेचे उमेदवार
आमशा पाडवी सचिन अहिर
काँग्रेसचे उमेदवार
चंद्रकांत हंडोरे भाई जगताप
भाजपचे उमेदवार
प्रवीण दरेकर श्रीकांत भारतीय राम शिंदे उमा खापरे प्रसाद लाड