कोल्हापूरचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण
ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर आहे
कोल्हापूर : जिल्ह्यातील आणखी एका बड्या राजकीय घरात कोरोनाचा शिरकाव झाला. कोल्हापूरमधील काँग्रेसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)
ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभा आमदार आहेत. ऋतुराज यांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला.
ऋतुराज पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र सुदैवाने त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे.
“माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात उपचार सुरु आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.” असे ट्वीट ऋतुराज पाटील यांनी केले.
माझी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. काल रात्री रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने कोल्हापूरात उपचार सुरू आहेत. माझी तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती.
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) August 21, 2020
कोल्हापुरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही ‘कोविड योद्धा’ म्हणून जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी चारच दिवसांपूर्वी केलं होतं. “हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” असा व्हिडीओ शेअर करत ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केलं आहे. “त्याला काय हुतंय?” हा शब्दप्रयोग वापरत ऋतुराज यांनी कानपिचक्या दिल्या होत्या. (Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)
ऋतुराज पाटील यांचा परिचय
ऋतुराज पाटील हे काँग्रेसकडून कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत. गेल्या वर्षी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या ऋतुराज पाटील यांनी भाजपचे दिग्गज उमेदवार अमल महाडिक यांचा तब्बल 40 हजारांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.
ऋतुराज पाटील यांना समृद्ध राजकीय आणि सामाजिक वारसा लाभला आहे. ऋतुराज हे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. सतेज पाटलांनी गेल्या वर्षी धडाक्यात आपल्या पुतण्याचे लाँचिंग केले होते.
आमदारपदी वर्णी लागल्यापासून ऋतुराज पाटील कोल्हापुरात वेगवेगळे उपक्रम राबवताना दिसतात. कोल्हापुरातील युवक वर्गात त्यांचा दांडगा संपर्क आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी ऋतुराज पाटील यांची निवड झाली आहे.
संबंधित बातम्या :
युवा आमदार ऋतुराज पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी
“हे कोल्हापूर आहे, एकदा ठरलं की ठरलं, आता पुन्हा एकदा आमचं ठरलंय!” ऋतुराज पाटील यांच्या कानपिचक्या
(Kolhapur Congress MLA Ruturaj Patil tested positive for Corona)