कोल्हापुरात ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या केएमटी बस रोखल्या! हद्दवाढ कृती समितीचा आक्रमक पवित्रा, काय आहेत नेमक्या मागण्या?
Kolhapur KMT : फक्त केएमटी बस नव्हे तर लोकप्रतिनिधींचा पाणीपुरवठाही बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यांना हद्दवाढीला विरोध आहे, त्यांचा पाणी पुरवठा बंद करा, असा इशारा देण्यात आलाय. 13 सप्टेंबर पासून केएमटी सेवा बंद पाडण्याचा इशारादेखील हद्दवाढ कृती समितीने दिला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर हद्दवाढ कृती समिती आता आक्रमक झाली आहे. कोल्हापुरातील (Kolhapur News) हद्दवाढ कृती समितीने केएमटी बस सेवा रोखण्याचा प्रयत्न केलाय. सोमवारी सकाळी केएमटी वर्कशॉप (KMT Workshop) बाहेर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात (Kolhapur Protest) सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कोल्हापूर हद्दवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा याआधीच कोल्हापूर हद्दवाढ कृती समितीने दिला होता. त्यानुसार आज सकाळीच आंदोलन करत केएमटी वर्कशॉपबाहेर निदर्शनं करण्यात आली.
हद्दवाढीचा प्रश्न पेटला
कोल्हापूर हद्दवाढीचा प्रश्न अधिक पेटण्याचीच चिन्हं निर्माण झाली आहे. कोल्हापूरमधील हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटी सेवा बंद करा, असा इशारा हद्दवाढ कृती समितीने दिला होता. अन्यथा 12 सप्टेंबरला केएमटी वर्कशॉपला टाळे ठोकणार, असंही कृती समितीने म्हटलं होतं. हद्दवाढ कृती समितीने महापालिकेला इशारा दिल्यानंतर आता सोमवारी सकाळीच केएमटी बसच्या वर्कशॉप बाहेर निदर्शनं करण्यात आली.
फक्त केएमटी बसच नव्हे तर लोकप्रतिनिधींचा पाणीपुरवठाही बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ज्यांचा हद्दवाढीला विरोध आहे, त्यांचा पाणी पुरवठा बंद करा, असा इशारा देण्यात आलाय. 13 सप्टेंबर पासून केएमटी सेवा बंद पाडण्याचा इशारादेखील हद्दवाढ कृती समितीने दिला होता. तर केएमटी सेवा रोखल्यास शहरात येणारा दूध आणि भाजी पुरवठा रोखू, असं हद्दवाढ विरोधी कृती समितीने म्हटलं होतं. एकूणच या सगळ्या तणावात आता कोल्हापूरमध्ये वातावरण तापलंय.
LIVE Video : पाहा ताज्या घडामोडी
हद्दवाढीचं प्रकरण नेमकं काय?
कोल्हापूरमध्ये हद्दवाढीचा वाद गंभीर होत चालला आहे. एकूण 18 गावांसह दोन एमआयडीची यांचा कोल्हापूर हद्दीत समावेश करावा, असा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला काही जण विरोध करत आहेत. विशेष करुन ग्रामीण भागाचा हद्दवाढीला विरोध असल्याचं दिसून आलंय. या हद्दवाढीवरुन ग्रामीण आणि शहरी भाग आमने-सामने आले आहेत. या संपूर्ण प्रकरणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकही पार पडली. या बैठकीत ठोस काही निर्णय होऊ शकला नाही. उलट आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय.
शिरोली, नागांव, वळिवडे-गांधीनगर, मुडशिंगी, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये, शिंगणापूर, नागदेवावाडी, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव एमआयडीसी या एकूण 20 गावांचा हद्दवाढ प्रस्तावात समावेश आहे. ज्यावरुन राजकारण तापत असल्याचं पाहायला मिळतंय.