भिडेंचा भाजपशी संबंध नाही म्हणता, मग नरेंद्र मोदी आले, तेव्हा त्यांना कोण भेटलं होतं?; काँग्रेस आमदाराचा सवाल
Satej Patil on Sambhaji Bhide Statement : गांधींचा विचार सोडणार नाही, उलट गांधींचे विचार अधिक बळकट होतील; काँग्रेस आमदाराची संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया
कोल्हापूर | 31 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. भिडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी लावून धरली. अशातच भाजप भिडे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. आधी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आज काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपला सवाल केलाय.
देश आणि राज्यासमोरचे प्रश्न दुर्लक्षित करण्यासाठी, जनतेचं विचलित करण्यासाठी ही अशी वक्तव्य केली जात आहेत. काँग्रेस नेत्यांना धमकी देण्यात येतेय. या धमक्यांना कुणी घाबरणार नाही. महात्मा गांधी यांचा विचार कुणी सोडणार नाही. गांधी विचारांपासून बाजूला जाणार नाही. उलट या विचारामुळे गांधी बळकट होतील, असं सतेज पाटील म्हणालेत.
सरकारची धमक राहिली की नाही ही शंका निर्माण झाली आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं जातं. यातून लक्षात येतं की लोकांचं धाडस किती वाढलंय. याचाच परिणाम म्हणून धमक्या देण्याचं धाडस केलं जातंय. राज्य शासनाने आता पावलं उचलली नाहीत. तर या धमक्यांचं सत्र कृतीमध्ये उतरेल. याबाबतीत त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची अपेक्षा आहे, असं सतेज पाटील म्हणालेत.
संभाजी भिडे यांचा भाजपशी संबंध नाही म्हणत ते म्हणत असतील. तर त्यांचे एक खासदार यशोमती ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणतात. एक आमदार जाऊन संभाजी भिडे यांना भेटतात. त्यांचे संबंध आहेतच. गरज भागली आणि संबंध नाकारले असे होणार नाही, असं सतेज पाटील म्हणालेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यावेळी त्यांना कोण भेटलं? आता हात झटकून टाकायचे आणि आपला संबंध नाही म्हणायचं, हे चालणार नाही. संबंध नसेल तर कारवाई करा नाहीतर संबंध आहे हे सिद्ध होईल, असं सतेज पाटील म्हणालेत.
महापुरूषांविरोधात अशी वक्तव्य मुद्दाम होत आहेत का? वक्तव्याची मालिका मुद्दामून केली जातेय का? अशी शंका आहे, असंही सतेज पाटील म्हणालेत.