केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन शरद पवार आक्रमक
राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेस नेत्यांच्या मागणीला पाठिंबा देत शरद पवार यांनीही आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर पवारांनी जोरदार निशाणा साधलाय.
मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज राष्ट्रपदी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. काँग्रेस नेत्यांच्या मागणीला पाठिंबा देत शरद पवार यांनीही आता केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर पवारांनी जोरदार निशाणा साधलाय. (Sharad Pawar demands resignation of Union Home Minister of State Ajay Mishra)
उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत. लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आले. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. असा प्रकार कधी घडलेला नव्हता. काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते. ते सुरुवातीला नाकारलं गेलं. कारवाईची मागणी झाली. पण त्यावर उत्तर प्रदेश किंवा केंद्र सरकारनं काही पाऊल टाकलं नाही. पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करावी लागली आणि हे सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर घडलं. अपेक्षा अशी होती की शेतकऱ्यांची हत्या झाली, सत्ताधारी पक्षातील नेत्यावर आरोप झाला तरी सत्ताधारी पक्षानं काही भूमिका घ्यावी. पण सत्ताधारी पक्षाकडून पहिल्यापासून फक्त बघ्याची भूमिका घेतली गेली, अशी खंत पवार यांनी व्यक्त केलीय.
‘केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
या संपूर्ण घटनेची जबाबदार उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवी. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या पदावरुन मुक्त व्हावं. आज त्याची गरज आहे. जेणेकरुन लोकांचा, व्यवस्था, कायदा-सुव्यवस्थेची यंत्रणा आणि सरकार म्हणून लोकांचा विश्वास राहील, असं शरद पवार यांनी म्हटलंय.
मावळ गोळीबारावरुन फडणवीसांना प्रत्युत्तर
लखीमपूरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी एक वक्तव्यं केलं. त्यांनी विचारलं की मावळमध्ये काय घडलं? त्यांनी विचारलं ते फार बरं केलं. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमूखी पडले. पण त्यांच्या मृत्यूला कोणत्या राजकीय पक्षाचे नेते नव्हते. आरोप पोलिसांवर होता. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यालाठछी काही पावलं उचललं होती. मावळच्या शेतकऱ्यांवर जो गोळीबार झाला. त्याबाबत लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांवर मोठी नाराजी होती. तिच स्थिती आज लखीमपूरच्या बाबतीत आहे, असं शरद पवार म्हणाले.
‘मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं?’
त्याचबरोबर मावळमध्ये आता चित्र बदललं आहे. लोकांना वस्तुस्थिती कळाली आहे. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे सांगत, मावळ तालुक्यात सातत्यानं जनसंघ, नंतर भाजप होतं. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असंही पवार म्हणाले. इतकंच नाही तर मावळमध्ये लोकांना भडकावण्याचं काम कुणी केलं हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकानं निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकानं राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
इतर बातम्या :
फडणवीसांकडून मावळ गोळीबाराची आठवण, आता पवारांनी मावळातील वस्तुस्थितीच माडंली!
‘अजुनी यौवनात मी’, खासदार संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला
Sharad Pawar demands resignation of Union Home Minister of State Ajay Mishra