अमित देशमुख भाजपाच्या वाटेवर? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
भाजयुमो आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुखांबाबत नुकतंच वक्तव्य केलंय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे पुत्र, माजी मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) काँग्रेसमधून भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या लातुरात रंगली आहे. भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Nilangekar) यांच्या वक्तव्यानंतर मराठवाड्यात हीच चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. अमित देशमुखांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठं विधान केलं. येत्या काही काळात भाजपात अनेक दिग्गज नेते प्रवेश करणार आहेत. लवकरच हे बॉम्बस्फोट होतील, असं सूतोवाच बावनकुळे यांनी केलं.
औरंगाबादेत पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘ येत्या काही दिवसात भाजपामध्ये अनेक मोठे मोठे नेते येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पूर्ण पक्ष रिकामे होतील.
शिवसेनेचे अनेक लोक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.. ही सगळी लोक भाजपामध्ये येतील यात बरीच मोठे मोठी नावं आहेत.. फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे..
प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असं वक्तव्यही बावनकुळे यांनी केलं.
तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हेदेखील आज औरंगाबादेत होते. अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेसाच्या चर्चांवर भाष्य करणं त्यांनी टाळलं. अमित देशमुख भाजपात येणार की नाही, हे भाजपच्या अध्यक्षांना माहिती असेल अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.
संभाजी पाटील निलंगेकर यांचं वक्तव्य काय?
भाजयुमो आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अमित देशमुखांबाबत नुकतंच वक्तव्य केलंय. राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा टिकवून ठेवण्यासाठी आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत..
पण ते इच्छुक असले तरीही भाजपा त्यांना पक्षात प्रवेश देणार नाही, असंही निलंगेकर यांनी पुढे स्पष्ट केलं. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या मेळाव्यात ते बोलत होते.