भोपाळ : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे सर्वच पक्षांनी ताकदवान उमेदवार शोधण्याचा वेग वाढवला आहे. त्यात काँग्रेसने तर भाजपला पराभूत करण्यासाठी जंग-जंग पछाडले आहे. आपला उमेदवार प्रतिस्पर्ध्यांना भारी पडणारा असावा, यासाठी अनेक पक्ष एकतर मतदारसंघातील ताकदवान नेता उमेदवार म्हणून पुढे करतात किंवा मग सेलिब्रिटींना उमेदवारी देतात. मध्य प्रदेशात काँग्रेसही सेलिब्रिटींना उतरवण्याच्या तयारीत आहे. मात्र, इथे कुठली एक-दोन सिनेमे किंवा मालिका केलेली सेलिब्रिटी नव्हे, तर थेट प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरलाच उतरवण्याच्या तयारी असल्याचे दिसते आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून अभिनेत्री करिना कपूर हिला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे स्थानिक नेत्यांनी मागणी केली आहे. भोपाळच्या लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे या जागेवरुन करिना कपूरला उतरवल्यास काँग्रेसला मोठा फायदा होईल, असाही स्थानिक काँग्रेस नेत्याचा दावा आहे.
काँग्रेसचे भोपाळमधील स्थानिक नेते असलेल्या गुड्डू चौहान आणि अनीस खान यांनी भोपाळच्या जागेसाठी करिनाचं नाव सूचवलं आहे. भोपाळमध्ये करिनाचे चाहते लाखोंच्या संख्येत आहेत, याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असेही या नेत्यांचे म्हणणे आहे. गुड्डू चौहान आणि अनीस खान हे दोघेही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे करिनाच्या नावाची शिफारस भोपाळ मतदारसंघासाठी करणार आहेत.
करिना कपूर आणि भोपाळचं कौटुंबिक नातं आहे. अभिनेता सैफ अली खानची करिना पत्नी आहे. सैफ अली खानचं कुटुंब हे भोपाळच्या पतौडी घराण्यातील आहे. त्यामुळे पतौडी घराण्याची सून या नात्याने करिनाला भोपाळमध्ये प्रचंड मान-सन्मान आहेच, सोबत तेथील लोकांमध्ये तिच्याबद्दल कुतुहल आणि आकर्षण सुद्धा आहे.
याआधीह पतौडी घराण्यातील नवाब पतौडी भोपाळमधून निवडणूक लढले होते. मात्र, त्यावेळी ते पराभूत झाले होते.