महाविकास आघाडीचं ठरलं?, वंचित आघाडीला किती जागा?, राजू शेट्टी यांचं काय?; डिटेल्स एका क्लिकवर
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 44 लोकसभा जागांची महाविकास आघाडीने बोलणी पूर्ण केली आहे. कुणाच्या वाट्याला किती जागा द्यायाचा याचा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीतून ठाकरे गट सर्वाधिक जागा लढणार आहे. तर त्याखालोखाल काँग्रेसला आणि नंतर राष्ट्रवादीला जागा मिळाल्या आहेत.
दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असून सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सभा, गाठीभेटी सुरू असतानाच महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरबैठकाही सुरू केल्या आहेत. मात्र, या सर्वात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीने राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी जवळपास 44 जागांचं वाटप पूर्ण केल्याचं सांगितलं जात आहे. या जागा वाटपात ठाकरे गटाच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्या आहेत. तर जागा वाटपात काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या जागा वाटपात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीसह शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यासाठीही जागा सोडण्यात आल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाला 19 ते 21 जागा सोडण्यात येणार आहेत. काँग्रेसला 13 ते 15 आणि शरद पवार गटाला 10 ते 11 जागा सोडण्यात येणार आहेत. त्यात दोन जागा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्यात आल्या आहेत. तर चार जागांचा तिढा कायम असून हा तिढा चर्चेतून सोडवला जाणार आहे.
एका-एका जागेवर बोळवण?
या जागा वाटपात मित्रपक्षांना फक्त दोन जागा सोडण्यात आल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांना अकोल्याची तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा सोडण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत नाही आले तर अकोल्याची जागा काँग्रेस लढणार असून राजू शेट्टी यांनीही आघाडीत येण्यास नकार दिल्यास ती जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चार जागांचा तिढा कायम
महाविकास आघाडीने 44 जागांवर बोलणी पूर्ण झाली आहे. मात्र, चार जागांचा तिढा कायम आहे. भंडारा, गोंदिया, अमरावती आणि जालना या चार जागांचा तिढा कायम आहे. या चारही जांगावर चर्चेतून तोडगा काढण्याचं ठरलं आहे. भंडारा-गोंदियाची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चेतून सोडवणार आहे. हिंगोलीची जागा राष्ट्रवादी आणि ठाकरे गट चर्चेतून सोडवणार आहे. जालन्याची जागा राष्ट्रवादी आणि शिवसेना चर्चेतून सोडवणार आहे.
मुंबईत आवाज ठाकरेंचाच
मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांचीही वाटणी झाली आहे. मुंबईसाठी चार दोन असा फॉर्म्युला करण्यात आला आहे. यानुसार चार जागा ठाकरे गट आणि दोन जागा काँग्रेस लढणार आहेत. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा ठाकरे गट लढवण्याची शक्यता आहे. तर, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबईतून काँग्रेस लढण्याची शक्यता आहे.