दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झाल्याचं वृत्त आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 44 जागांचं वाटप पूर्ण केलं आहे. उरलेल्या सहा जागांपैकी दोन जागा प्रकाश आंबेडकर आणि राजू शेट्टी यांच्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तर चार जागांपैकी काही जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादी तर काही जागांवर शिवसेना आणि काँग्रेस चर्चेतून तोडगा काढणार आहे. मात्र, यात सर्वांचं लक्ष लागलंय ते मुंबईतील जागांवर. मुंबईत महाविकास आघाडीत कुणाच्या वाट्याला किती जागा मिळाल्या याचीच सध्या जोरदार चर्चा आहे.
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मुंबईतील जागा वाटपात चार दोन असा फॉर्म्युला वापरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाच्या वाट्याला चार जागा आल्या असून काँग्रेसच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या जागा वाटपात शरद पवार गटाला मुंबईतील एकही जागा देण्यात आलेली नाही. मुंबईत शरद पवार गटाचं तसं फारसं अस्तित्व नाही. महापालिकेतही त्यांची दोन अंकी संख्या निवडून येत नाही. त्यामुळे शरद पवार गटाला मुंबईत एकही जागा सोडण्यात आलेली नाही. या उलट पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात अधिक जागा सोडण्यात आल्या आहेत.
दक्षिण मुंबई : ठाकरे गट
दक्षिण मध्य : ठाकरे गट
ईशान्य मुंबई : ठाकरे गट
उत्तर पश्चिम मुंबई : ठाकरे गट
उत्तर मध्य मुंबई : काँग्रेस
उत्तर मुंबई : काँग्रेस
या जागा वाटपात उत्तर पश्चिम मुंबई हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे गजानन कीर्तिकर हे खासदार आहेत. कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटात आहेत. ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईत अमोल यांना तिकीट देण्याचं घटत आहे. त्यामुळे आगामी काळात उत्तर पश्चिम मुंबईत कीर्तिकर विरुद्ध कीर्तिकर असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईत शिवसेनेचे एकूण तीन खासदार निवडून आले होते. गजानन कीर्तिकर, अरविंद सावंत आणि राहुल शेवाळे हे तिघे निवडून आले होते. या तिघांपैकी गजानन कीर्तिकर आणि राहुल शेवाळे हे शिंदे गटात आहेत. फक्त अरविंद सावंत ठाकरे गटात आहेत. महायुतीत ठाकरे गटाच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या तीन जागांवर ठाकरे गट कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाला उरलेल्या तीन जागांवर तुल्यबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा ठाकरे गटाकडे लागल्या आहेत.