महाविकास आघाडीत भूकंप… महाफूट! ये तो होना ही था… भाजपची एका वाक्यात प्रतिक्रिया; काँग्रेस नेते काय म्हणाले?
अखेर महाविकास आघाडीत फूट पडली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या फुटीवर शिक्कामोर्तब केलं आहे. आमचा पक्ष महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी केलेल्या या राजकीय भूकंपानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारून पराभवामुळे महाविकास आघाडी दुभंगली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चलबिचल सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीसह महायुतीच्या नेत्यांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. भाजपने ये तो होना ही था, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तर महापालिका निवडणुकीत जिथं शक्य आहे, तिथं बसून तोडगा काढू, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीतील फुटीवर भाष्य केलं आहे. ये तो होनाही था. काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात काहीच ताळमेळ नव्हता. काँग्रेससोबत जायची वेळ आली तर शिवसेना नावाचं दुकानबंद करेल असं बाळासाहेब म्हणाले होते. सावरकरांबाबत काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी जेव्हा अपशब्द काढले तेव्हा बाळासाहेबांनी अय्यर यांना जोड्याने मारण्याची भाषा केली. त्यांनी सावरकरांची बाजू घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसचं फार काळ टिकेल हे वाटत नव्हतं. ही तात्पुरती युती होती. खुर्चीसाठीची युती होती. आता काँग्रेसचा खरा चेहरा शिवसेनेच्या लक्षात आला आहे. तो खरा चेहरा घराणेशाहीचा. देशापेक्षा खुर्ची मोठी मानणारा आहे. हे एक दिवस होणारच होतं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुंगी सुद्धा हत्तीला…
शेवटी पक्ष कितीही मोठा असू द्या. कार्यकर्ते पक्ष मोठा करतात. पण पक्ष जेव्हा अहंकारात जातो, पक्षाचे नेते अहंकारात जातात, कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना हीन समजतात, तेव्हा पक्ष रसाताळाला जातो. एक लक्षात ठेवा मुंगी सुद्धा हत्तीला जागा दाखवते, हे समजलं पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीत हे कधी ना कधी होणारचं होतं. पण ते लवकर झालं, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
काँग्रेसनेच इंडिया आघाडी तोडली
काँग्रेसच्या नेते पवन खेडा यांनीच इंडिया अलायन्स विसर्जित झाल्याचं सांगितलं. ही इंडिया आघाडी लोकसभेपुरती होती, आता संपलं, असं खेडा पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडी सोडली असं म्हणता येत नाही. महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा पार्ट आहे. एक कंपनी बुडाल्यावर त्याची भागिदार कंपनी बुडणारच, असं सांगतानाच 21 व्या शतकातील राजकारणात लोकांनी कोणी दीर्घकाळ शत्रू नाही आणि कोणी दीर्घकाळ मित्र नाही, अशी भूमिका घेतली आहे. पूर्वी वैचारिक लढाई व्हायची. मतभेद असायचे. पण मनभेद कधी नव्हते. पण आता कोणी कुणाचा शत्रू नाही, कोणी कुणाचा मित्र नसतो ही भूमिका घेतली आहे. त्यावर पुन्हा चिंतन होण्याची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात
काँग्रेस नेते अमित देशमुख यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या असतात. आघाडीत यावर चर्चा होईल. त्यानंतर निर्णय घेतील. तसेच आघाडीत प्रत्येक गोष्टीची चर्चा होईलच असं नाही. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने निवडणुकीची तयार करत असतो. काँग्रेसही करत आहेत. शरद पवार यांचा पक्षही करत आहे. गेली अनेक वर्ष निवडणुका झाल्या नाही. ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी निवडणुका घेतल्या नाही. खूप काळ लोटला आहे. जिथे शक्य असेल तिथे एकत्र बसून चर्चा करता येऊ शकते. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असं अमित देशमुख म्हणाले.
महाविकास आघाडीत विसंवाद नाही. आघाडी इंडिया अलायन्सचा भाग आहे. देशात आणि राज्यात आघाडी आहे. एखाद्या निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाही तर माध्यमात चर्चा होते, राजकीय नेते त्यावर भाष्य करतात. मला वाटतं ते चुकीचं नाही. स्पष्ट मत मांडल्यावर योग्य दिशा मिळते, असंही देशमुख म्हणाले.