Manikrao Jagtap | महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती.
रायगड : महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी 2 वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कोण होते माणिकराव जगताप?
काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष
महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार
महाड नगरपालिकेवर 15 ते 20 वर्ष वर्चस्व
रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख
दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते
माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा
काँग्रेसने धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला: राऊत
रायगड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व करणारे माणिकराव जगताप यांच्या निधनाने काँग्रेसने एक धडाडीचा व निष्ठावान नेता गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री व अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.
विद्यार्थीदशेपासून काँग्रेसचे बाळकडू मिळालेल्या माणिकराव यांनी एन.एस.यू.आय., युवक काँग्रेसमध्ये नेतृत्वाची चमक दाखवित काँग्रेसमध्ये एक स्थान निर्माण केले. रायगड जिल्ह्यात इतर पक्षाचा प्रभाव असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत त्यांनी महाड-पोलादपूर या विधानसभा मतदारसंघातून २००४ मध्ये विजय संपादन केला होता. सातत्याने लोकांशी संपर्कात असणाऱ्या या नेत्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार टिकून राहिला आहे. काँग्रेसच्या प्रतिकूल स्थितीमध्ये त्यांची काँग्रेसवरील निष्ठा कधीही कमी झाली नाही. त्यांनी सातत्याने काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन समाजकारण आणि राजकारण केले. विधानसभेत त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मला मिळाली. विधानसभेतही ते सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत होते. आपल्या भागाच्या विकासाचे अनेक प्रश्न सोडविण्याची त्यांची हातोटी अनुकरणीय होती. एक उमदा नेता व कुशल संघटक काँग्रेसने गमावला आहे, असेही डॉ. राऊत यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
मान्यवरांकडून श्रद्धांजली
कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन व्यक्त करण्यात आल्या आहेत.
महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/tzc3VskS76
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 26, 2021
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनीही ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे
? भावपूर्ण श्रद्धांजली ?
आमचे मार्गदर्शक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, माज़ी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन झाले आहे. मी जगताप परीवाराच्या विशेषत: त्यांची कन्या आमची बहिण महाडची नगराध्यक्षा स्नेहल व चिरंजीव श्रीयश यांच्या दुःखात सहभागी आहे. pic.twitter.com/1pblDIPK4v
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 26, 2021
संबंधित बातम्या :
रायगडमध्ये लॉकडाऊनवरुन राजकीय मतभेद, काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा तटकरे बापलेकीवर नाव न घेता निशाणा
(Mahad Former MLA Raigad Congress District Chief Manikrao Jagtap Dies)