Sangamner Vidhan Sabha 2024 : संगमनेरमध्ये फक्त थोरात, थोरात आणि थोरातच…असं का? कोणीच त्यांना का हरवू शकत नाही?

Sangamner Vidhan Sabha 2024 : संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात असं मागच्या 40 वर्षांपासून समीकरण आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांना हरवणं खूप कठीण आहे, असं म्हटलं जातं. पण असं का?. आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. महाराष्ट्रात संगमनेर हा विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

Sangamner Vidhan Sabha 2024 : संगमनेरमध्ये फक्त थोरात, थोरात आणि थोरातच...असं का? कोणीच त्यांना का हरवू शकत नाही?
balasaheb thorat vs sujay vikhe patil
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 11:47 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या 288 मतदारसंघांसाठी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना आहे. युती-आघाडीमध्ये काही जागांवर अजूनही पेच आहे. पण तो लवकरच सुटेल. 29 ऑक्टोंबर 2024 हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला रंगत येईल. सध्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होत असताना एक विधानसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे संगमनेर. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघ येतो. संगमनेरच नाव निघालं किंवा राजकीय चर्चा सुरु झाली की, सर्वप्रथम नाव येतं, ते बाळासाहेब थोरातांच. संगमनेर म्हणजे बाळासाहेब थोरात हे मागच्या 40 वर्षांपासूनच चालत आलेलं राजकीय समीकरण आहे. आज संगमनेर चर्चेत येण्यामागच कारण आहे, ते म्हणजे जयश्री थोरात यांच्याबद्दल झालेलं वादग्रस्त वक्तव्य. जयश्री थोरात या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत. जयश्री थोरात यांच्याविषयी भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य तसच संगमनेर विधानसभा

मतदारसंघाविषयी जाणून घेण्याआधी या सगळ्याशी जोडलेलं अहमदनगर जिल्ह्याच राजकारण समजून घेऊया. अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक मोठा जिल्हा आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण दोन लोकसभा आणि बारा विधानसभा मतदारसंघ आहेत. दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये अहमदनदर दक्षिण लोकसभा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ येतो. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड हे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा ही 6 विधानसभा क्षेत्र आहेत. आता संगमनेरच जे राजकारण तापलय, त्यामागे चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांचा झालेला पराभव कारण आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. संगमनेर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात येत सुद्धा नाही. मग, सुजय विखेंच्या पराभवावरुन संगमनेरमधील राजकारण तापण्याच कारण काय?

संगमनेरमधील राजकारण का तापलं?

हे कारण समजून घेण्यासाठी आपल्याला जिल्ह्याच राजकारण समजून घ्यावं लागेल. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यात अनेक सहकारी साखर कारखाने, दूध संघ आहेत. अहमनगर जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मागच्या काही वर्षात अहमदनगर जिल्ह्यात राजकारण बदललं. भाजपाने इथे हात-पाय पसरले. सुजय विखे पाटील यांनी 2019 साली भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर या जिल्ह्यातील राजकारणच बदलून गेलं. आज अहमदनगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात घराणेशाही दिसून येते. त्यात विखे-पाटील आणि थोरात ही अहमदनगर जिल्ह्यातील दोन मोठी राजकीय घराणी. गेल्या कित्येक दशकांपासून या दोन कुटुंबांभोवतीच अहमदनगर जिल्ह्यात राजकारण फिरत आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मिळवण्याचा आणि वर्चस्व ठेवण्याचा नेहमीच दोन्ही कुटुंबांचा प्रयत्न राहीला आहे. त्यातूनच या दोन्ही कुटुंबात गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय संघर्ष सुरु आहे.

जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंतराव देशमुखांचा इतिहास काय?

सर्वप्रथम आपण जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा नेते वसंतराव देशमुख यांचा इतिहास जाणून घेऊया. वसंतराव देशमुख विरुद्ध बाळासाहेब थोरात हा संघर्ष जुना आहे. मागच्या चार दशकांपासूनचा हा वाद आहे. या वादामागे आहे, साखर कारखान्याच राजकारण. 1984 साली नगरच्या पट्ट्यात सहकारी चळवळ रुजत होती. माजी मंत्री आणि सहकार नेते बीजी खताळ पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने संगमनेर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. पण काही वर्षातच खताळ पाटील यांची सहकारी साखर कारखान्यवरील पकड कमी होऊ लागली. त्याचवेळी स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांची कारखान्यावर पकड घट्ट होऊ लागली. 1989 साली साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माईक हाती येताच वसंतराव देशमुख यांनी थोरातांवर टीका सुरु केली. परिणामी स्टेजवरच वसंतरावांना थोरातांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यानंतर अहमदनगरच्या राजकारणात विखे-पाटलांची शक्ती वाढली. परिणामी सगळे थोरात विरोधी विखे-पाटलांकडे गेले. 2009 साली पुन्हा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माईक हाती येताच वसंतराव देशमुखांनी पुन्हा थोरातांविरोधात वक्तव्य सुरु केली. त्यावेळी सुद्धा थोरातांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. आता 2024 साली पुन्हा संगमनेरमधील धांदरफळमध्ये वसंतराव देशमुखांनी जुन वैर उकरुन काढलं. त्यांनी जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. परिणामी अहमदनगर जिल्ह्याचच नव्हे, महाराष्ट्रातील राजकारण तापलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंतराव देशमुखांमुळे महायुतीची कोंडी झाली. महायुतीकडून एकाबाजूला लाडकी बहिण योजनेचा जोरात प्रचार सुरु आहे. त्याचवेळी वसंतराव देशमुखांनी एका महिलेबद्दल अशी वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षांनी महायुतीच्या राजकीय संस्कृतीवर टीका केली.

विखे पाटील विरुद्ध थोरात हा वाद काय?

आता अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील विरुद्ध थोरात संघर्ष समजून घेऊया. विखे पाटील विरुद्ध थोरात हा पूर्वापार चालत आलेला राजकीय वाद आहे. सुजय विखे पाटील आणि जयश्री थोरात या तिसऱ्या पिढीतही हा वाद कायम राहणार हे स्पष्ट आहे. बाळासाहेब विखे पाटील विरुद्ध भाऊसाहेब थोरांतापासून या संघर्षाला सुरुवात झाली. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार परस्परांचे कट्टर विरोधक. त्याचा सुद्धा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर झाला. पवारांनी नेहमीच विखे विरोधी गटाला बळ दिलं. राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये सुद्धा हा राजकीय वाद कायम राहीला. मूळात विखे पाटील आणि थोरात या दोन्ही कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधूनच झाली. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा या दोन्ही कुटुंबात फारस कधी सख्य नव्हतं. त्यांच्यात जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व मिळवण्याची लढाई सुरुच राहिली. शिर्डी आणि संगमनेर दोघांचे मतदारसंघ वेगवेगळे असल्यामुळे वाद एका मर्यादेबाहेर वाढला नाही. पण 2019 साली आधी सुजय विखे पाटील त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील या पिता-पुत्रांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारणच बदलून गेलं. आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने भाजपाकडे नगर जिल्ह्यात मोठी राजकीय ताकद आहे. आज विखे-पाटलांमुळे भाजपाची नगरमध्ये ताकद वाढली आहे. भाजपाकडे संगमनेरच्या राजकारणावर घट्ट पकड असलेल्या थोरांताना आव्हान देण्यासाठी त्या तोडीचा, तोलमालाचा विरोधक आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचं नगरमध्ये सहकारी संस्थांच मोठं जाळं आहे. त्या माध्यमातून त्यांचं इथे राजकारण चालतं.

सुजय विखेंचा थोरातांवर राग का?

चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. 2019 मध्ये त्यांनी इथून जवळपास 2 लाखाच्या मताधिक्क्याने निवडणूक जिंकली होती. 2024 मध्ये त्यांच्यासमोर शरद पवार गटाच्या पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं आव्हान होतं. सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार असा निलेश लंके यांचा प्रवास राहिला आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या तुलनेत निलेश लंके हे तसे साधे उमेदवार. त्यांच्यामागे सहकारी संस्थांची ताकद नव्हती. पण मविआचा घटक या नात्याने काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंकेंच्या मागे आपली सर्व ताकद उभी केली. त्यांना सर्व रसद पुरवली. थोरांतांची यंत्रणा निलेश लंकेंच्या विजयासाठी काम करत होती. परिणामी डॉ. सुजय विखे पाटील यांचा जवळपास 29 हजार मतांनी पराभव झाला. तोच राग सुजय विखे पाटील यांच्या मनात आहे. म्हणूनच ते संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवणार असं म्हणत आहेत. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून सुजय विखे संगमनेरमध्ये सक्रीय झाले आहेत. इथे येऊन ते सातत्याने राजकीय सभा, कार्यक्रम घेत आहेत. सुजय विखे यांच्यामागे सहकारी संस्थांच बळ आहे, म्हणूनच ते बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्याची भाषा करत आहेत.

संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांताना हरवणं कठीण का?

संगमनेर विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांची मागच्या 40 वर्षांपासून घट्ट पकड आहे. मागच्या आठ टर्मपासून ते इथून आमदार आहेत. 1985 पासून संगमनेरमधून बाळासाहेब थोरात सातत्याने निवडून येत आहेत. 1990 चा अपवाद वगळता बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून नेहमीच एकतर्फी विजय मिळवला आहे. 1990 साली भाजपाच्या वसंतराव गुंजाळ यांचा संगमनेरमध्ये फक्त 4062 मतांनी पराभव झाला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक निवडणुकीत मताधिक्क्य वाढवतच नेलं. बाळासाहेब थोरात यांना आजच्या घडीला संगमनेरमध्ये हरवण खूप कठीण आहे. आज भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कराखान्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्था, अमृतवाहिनी बँक, राजहंस दूध, सहकारी संस्था, अमृत उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकारी संस्थांच जाळं त्यांनी विणलं आहे. या सहकाराच्या माध्यमातून मतदार बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर जोडलेला आहे. एकूणच संगमनेरच्या अर्थकारणाच्या नाड्या त्यांच्या हातामध्ये आहेत. त्याशिवाय बाळासाहेब थोरात हे संयमी, शांत नेतृत्व आहे. सर्वांशी जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. बोलण्यातून जिंकून घेण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे, त्याशिवाय महाविकास आघाडीच सरकार आल्यास बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात. त्यामुळे सध्याच्या राजकीय स्थितीत सुजय विखे पाटील संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरांताना आव्हान निर्माण करु शकतात. पण त्यांना हरवणं खूप कठीण आहे.

Non Stop LIVE Update
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन
तर आम्हाला निवडून द्या..,शर्मिला ठाकरेंचं महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन.
'त्या' रात्री नेमकं काय घडलं,सुजय विखेंकडून भरसभेत 'लाव रे तो व्हिडीओ'
'त्या' रात्री नेमकं काय घडलं,सुजय विखेंकडून भरसभेत 'लाव रे तो व्हिडीओ'.
शिवसेनेची यादी जाहीर, ‘या’ 20 जणांना उमेदवारी? बघा यादीत कोण बडे नेते?
शिवसेनेची यादी जाहीर, ‘या’ 20 जणांना उमेदवारी? बघा यादीत कोण बडे नेते?.
विधानसेभेच्या रिंगणात पवारांची यंग बिग्रेड, कोणत्या चेहऱ्यांना तिकीट?
विधानसेभेच्या रिंगणात पवारांची यंग बिग्रेड, कोणत्या चेहऱ्यांना तिकीट?.
महायुती अन् मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, कोणकोण बंडखोरीच्या तयारीत?
महायुती अन् मविआला बंडखोर नेत्यांचं टेन्शन, कोणकोण बंडखोरीच्या तयारीत?.
धक्कातंत्र... शरद पवारांची खेळी, माजी आमदाराच्या लाडक्या लेकीला तिकीट
धक्कातंत्र... शरद पवारांची खेळी, माजी आमदाराच्या लाडक्या लेकीला तिकीट.
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?
मोहोळमध्ये सर्वात कमी वयाच्या उमेदवार, सिद्धी कदम आहे तरी कोण?.
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात
शरद पवारांची खेळी, आमदाराची ‘लाडकी लेक’ उतरवली विधानसभेच्या मैदानात.
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात
नवाब मलिकांच्या लेकीविरूद्ध 'या' अभिनेत्रीचा पती निवडणुकीच्या रिंगणात.
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी
एकनाथ शिंदेंना धक्का, शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत माजीमंत्र्याची घरवापसी.