खोका, धोका आणि आज धक्काबुक्कीचा मोका!, वाचा विधिमंडळासमोर नेमकं काय झालं?
आज विधिमंडळ अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधीच महाराष्ट्रानं अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या राड्यावेळी नेमकं काय झालं? पाहुयात...
मुंबई : आज विधिमंडळ अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Monsoon Session) पाचवा दिवस आहे. विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधीच महाराष्ट्रानं अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. सत्ताधारी अन् विरोधक थेट एकमेकांना भिडले. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात जोरदार घमासान झालं. हे दोन सत्ताधारी आणि विरोधक पक्षातील आमदार हमरीतुमरीवर आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधीगटातील नेते तिथं होते. कुणी खोक्याची भाषा केली तर कुणी धोक्याची आठवण करून दिली. पण या राड्यावेळी नेमकं काय झालं? पाहुयात…
अधिवेशन सुरु व्हायला अवघा काही वेळ राहिला होता. सगळे आमदार विधिमंडळाच्या दिशेने येत होते. मागचे काही दिवस पाहता त्याचप्रमाणे विरोधक आक्रमक होत सरकार विरोधात आंदोलन करणार आणि घोषणबाजी करणार हे जवळपास निश्चित होतं. पण आज सत्ताधारी पक्षही तयारीत होता. त्यांनीही विरोधकांना कडाडून विरोध करायचं ठरवलं होतं. त्यानुसार सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी केली. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत आहेत. पण या घोषणांवर सत्ताधाऱ्यांचा आवडलेला नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.
त्यावेळी विरोधकही तिथे होते. त्यांनीहीही पुन्हा एकदा 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा दिल्या. अन् तिथे अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. अमोल मिटकरी घोषणा देत होते. शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेही तिथे होते. अन् पाहता-पाहता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. तो गोंधळ इतका वाढला की पुढे धक्काबुक्की झाली.
50 खोके एकदम ओके! ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागल्याने ते असा गोंधळ घालत आहेत, असा आरोप विरोधकांकडून लावण्यात आला. जर पैसे घेतले नसतील. काही चुकीचं केलं नसेल तर त्यांना एवढा राग येण्याचं काही कारण नाही, असं मिटकरी म्हणालेत. आमच्या घोषणेवर ते चिडले आणि त्यांनी धक्काबुक्की केली, असा आरोप मिटकरी यांनी केला. महेश शिंदे कोण आहेत? मला माहिती नाही. त्यांना मी ओळखत नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारा हा विषय नाही. आम्ही गरीब मायबापाच्या पोटी जन्माला आलो, तुम्ही मोठ्या घरात जन्माला आला असाल, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तर काहीही माहिती नसताना विरोधक बेछूच आरोप करत आहेत. आम्ही एकही रुपया घेतलेला नाही, असं सत्ताधारी शिंदेगटातील आमदार म्हणत आहेत. “सत्तेसाठी कोणी काही करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. विधान सभेत पायऱ्यांवर बसून आंदोलन करतात तेव्हा मी विधान परिषदेत तो मुद्दा खोदून काढला. साधे 50 रुपये जरी मी घेतलेले असलेले तरी मी राजीनामा देईन. आम्ही सरकार म्हणून जनतेतून निवडून येतो. जर त्यांचे प्रश्न पूर्ण केले जात नसतील तर उठाव होतो”, असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले.