शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी मोठी बातमी, विधानसभा अध्यक्ष ठाकरेंवर संतापले
"जी लोकं स्वत: माजी मुख्यमंत्री झाले आहेत, ज्यांना विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच असे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचा हेतू काय आहे, हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट समजलं असेल", असं राहुल नार्वेकर म्हणाले.
मुंबई | 9 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर करणार आहेत. निकाल जाहीर करण्याची तारीख जवळ असताना दोन दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात भेट घडून आली. या भेटीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतला. त्यांनी या भेटीवर टीका केली. पण त्यांच्या टीकेवर राहुल नार्वेकर यांनी संताप व्यक्त केला. “विधानसभा अध्यक्ष कोणत्या कामांसाठी भेटू शकतात, त्यांची काय-काय कामे असतात, याची संपूर्ण कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी. तरीही ते असं म्हणत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे स्पष्ट होतंय”, असं राहुल नार्वेकर म्हणाले. “विधानसभा अध्यक्ष ज्यावेळेला आमदार अपात्रतेच्या याचिका निकाली काढत असतात त्यावेळेला त्यांना इतर कामे करु नयेत, असा कोणताही आदेश नाही. विधानसभा अध्यक्ष म्हणून विधीमंडळाच्या बोर्डाची कामे असतात. त्यात मुख्यमंत्रीदेखील सदस्य असतात. मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतात तेसुद्धा सोडवणं माझं कर्तव्य आहे”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
राहुल नार्वेकर यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली? याबाबत खुलासा केला. “राज्याच्याशी निगडीत इतर प्रश्न आहेत, त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर प्रश्न सोडवण्याची माझी गरज असेल तर मला वाटत नाही की, त्यासाठी मला कुणाची परवानगी घ्यावी लागेल. सर्वप्रथम माझी मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक ही 3 जानेवारीला नियोजित होती. पण ती होऊ शकली नाही. कारण मी आजारी होतो. मला तीन-चार दिवस घरातून बाहेर पडता आलं नाही”, असं नार्वेकरांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागचं कारण
“मी तब्येत सावरल्यानंतर रविवारी मतदारसंघाचे काही प्रश्न, तसेच विधीमंडळ बोर्डातील काही प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणं तातडीची आवश्यकता असल्याने मी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत कुलाबा-नरिमन पॉईंट कनेक्टरचा विषय, त्यात एमएमआरडीएकडून होणारी दिरंगाई आणि स्थानिकांचा विरोध, त्याबाबत चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील 8 रस्त्यांचं काँक्रीटीकरण करण्याचं काम थांबलं होतं. त्याबाबत चर्चा करणं आवश्यक होतं. दक्षिण मुंबईतील 6 लोकेशनचं ब्युटीफिकेशन करणं प्रलंबित होतं. याबाबत चर्चा होती. तसेच विधीमंडळातील जे कंत्राट कर्मचारी आहेत त्यांची कायम नियुक्ती करणं आणि जे 132 पदं रिक्त आहेत त्या संदर्भात बोर्डाने लवकरात लवकर निर्णय घेणं याबाबतची चर्चा प्रलंबित होती. त्यासाठी मी एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलो”, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.
‘मी आज जयंत पाटील आणि अनिल पाटील यांना भेटलो’, नार्वेकरांचा खुलासा
“जी लोकं स्वत: माजी मुख्यमंत्री झाले आहेत, ज्यांना विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी, त्यांनीच असे बिनबुडाचे आरोप केले तर त्यांचा हेतू काय आहे, हे आपल्या सगळ्यांना स्पष्ट समजलं असेल”, असं राहुल नार्वेकर म्हणाले. “मी आज सकाळी मुंबई विमानतळाच्या व्हीआयपी लाँजमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांना भेटलो. मग ते सुद्धा हेतूपुरस्पर होतं का? माझी तिकडे भेट झाली. भेट झाली की चर्चा होते. गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल आहेत त्यापैकी कुणीच मला भेटले नाहीत का? सुनील प्रभू, अजय चौधरी असे अनेक लोक येऊन भेटले आहेत. मी कुणालाच भेटायचं नाही का?”, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी केला.
‘मी जो निर्णय देणार आहे तो…’
“जो निर्णय घेत असतो, त्या व्यक्तीच्या निर्णय प्रकियेवर प्रभाव टाकण्यासाठी किंवा दबाव टाकण्यालाठी असे आरोप केले जातात. पण आपल्या माध्यमातून मी देशाच्या जनेतेला आश्वासन देऊ इच्छितो, मी जो निर्णय देणार आहे तो संविधानाच्या तरतुदींच्या आधारावर आणि विधीमंडळाच्या प्रथा-परंपरेचा विचार करुन योग्य निर्णय घेईन”, असं राहुल नार्वेकर म्हणाले.