Maharashtra BJP : महाराष्ट्रात किती जागा जिंकणार? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सांगितला आकडा
Maharashtra BJP : "लाडक्या बहिणींनी खूप मतदान केलं. शेतकऱ्यांनी मतदान केलं. बाकी वर्ग आहे, ज्यांना वाटतं डबल इंजिन सरकार यावं, त्यांनी मतदान केलय. राज्यात मविआ सरकार आलं, तर केंद्रातल्या योजना बंद पाडतील म्हणून महायुतीला मतदान केलं. शहरातला वर्ग, ग्रामीण वर्ग आमच्याबाजूने आहे"
महाराष्ट्रात यंदा विधानसभा निवडणुकीसाठी जास्त मतदान झालय. वाढलेल्या मतदानामुळे भाजपाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतील? तो आकडाच सांगून टाकला आहे. “एक्झिट पोलचा अंदाज राहू द्या. महाराष्ट्रातील जनता महायुतीसोबत आहे, हा मला विश्वास आहे. मोदी सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना, आमच्या सरकारने आणलेल्या व्यक्तीगत लाभाच्या योजना, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना वीज बिल माफी, डबल इंजिन सरकार यावं ही जनमानसाची भावना आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “मला मतदानाचा वाढलेला टक्का आमच्याबाजूने दिसतोय. उत्साहाने मतदार बाहेर निघतो, तेव्हा तो सरकारच्या बाजूने, चांगल्या कामाच्या बाजूने मतदान करतो” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
“लाडक्या बहिणींनी खूप मतदान केलं. शेतकऱ्यांनी मतदान केलं. बाकी वर्ग आहे, ज्यांना वाटतं डबल इंजिन सरकार यावं, त्यांनी मतदान केलय. राज्यात मविआ सरकार आलं, तर केंद्रातल्या योजना बंद पाडतील म्हणून महायुतीला मतदान केलं. शहरातला वर्ग, ग्रामीण वर्ग आमच्याबाजूने आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “लोकसभेला काँग्रेसने खोटारडेपणा केला, लोकांशी खोटं बोलून काँग्रेसने मतं घेतली, त्यांना धडा शिकवला पाहिजे, महिलांनी खूप मतदान केलं. टक्केवारी सांगता येणार नाही. मतदान खूप झालेलं आहे. आमचा चांगला विजय होईल, अपेक्षित नसेल इतका मोठा विजय मिळेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय?
“मला वाटत अंदाजित आकडा आम्ही पार करु. आमचे सध्या 105 आमदार आहेत, त्यापेक्षा जास्त जागा जिंकू. एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा परफॉर्मन्स चांगला राहील. तिघांच्या मिळून बहुमतापेक्षा जास्त जागा येतील” असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. “अपक्षांची गरज भासली नाही, तरी त्यांना सोबत घेऊ. अपक्ष मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमी सरकारसोबत असतात” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.