Sanjay Shirsat | पहिल्या टप्प्यात संधी हुकली, संजय शिरसाट म्हणतात मी नाराज नाही पण… !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले संदिपान भुमरे, अतुल सावे आणि अब्दुल सत्तार या तिघांनाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. दुसऱ्या टप्प्यात संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी अपेक्षा त्यांनी स्वतः बोलून दाखवलीय.
औरंगाबादः शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. मात्र औरंगाबादकरांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे एकनाथ शिंदे गटात गेलेले संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची मंत्रिपदी वर्णी लागली नाही. टीईटी घोटाळ्यात कनेक्शन असल्याचा आरोप असलेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिपद मिळालं पण संजय शिरसाट यांचं नाव चर्चेत असताना ते मागे ठेवण्यात आलं. यामुळे शिरसाट प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. शिरसाट यांनी मात्र आपण नाराज नसल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला असून सध्या विधिमंडळात आनंदाचं वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मी नाराज नाही, पण पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्याकडून त्यांना अपेक्षा असल्याचं स्पष्ट झालं.
संजय शिरसाट काय म्हणाले?
राजभवनात आज शिंदे सरकारमधील नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सर्व आमदार आणि मंत्री बाहेर पडल्यानंतर संजय शिरसाटही बाहेर निघाले. औरंगाबादकडे परतीच्या वाटेवर निघाल्यावर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ हा पहिला टप्पा झालाय. पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा एक मंत्रिमंडळ विस्तार होईल. आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराचं वातावरण चांगलं होतं. सगळे आनंदी होते. म्हणून हे सरकार एक दमदार सरकार म्हणून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल, असा माझा विश्वास आहे. आमच्याबरोबर उठाव करताना जे लोकं आले होते, त्यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांचा समावेश केला जाईल. मुख्यमंत्री शिंदेंवर माझी कोणतीही नाराजी नाही.
अब्दुल सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान
दरम्यान टीईटी घोटाळ्यात नाव चर्चचेत आलेले आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राज्यात गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार करून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवून बोगस प्रमाणपत्र देण्यात आले. अशा 7 हजार 800 उमेदवारांची नावं नुकतीच जाहीर झाली. यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सत्तारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र आरोपानंतरही त्यांना मंत्रिपद देण्यात आल्याने सर्वत्र आश्यर्य व्यक्त केलं जातंय.
औरंगाबाद आता मंत्र्यांचा जिल्हा!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले संदिपान भुमरे, अतुल सावे आणि अब्दुल सत्तार या तिघांनाही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. दुसऱ्या टप्प्यात संजय शिरसाट यांना मंत्रिपद मिळू शकतं, अशी अपेक्षा त्यांनी स्वतः बोलून दाखवलीय. त्यातच केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड तसेच केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे हे दोन मंत्रीही इथलेच. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद जिल्हा हा मंत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल.