Eknath Shinde: बंडाची कहानी एकनाथ शिंदेंची जुबानी, राज्यसभेला ‘संजय’ कसा पडला? मुख्यमंत्र्यांनी सगळं मोकळं करुन सांगितलं
राज्यसभा निवडणुकीत संजय पवार कसे पडले, हे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ' तर संजय पडला कसा? बघितलं तर आम्ही कॅलक्युलेशन केलं....
मुंबईः महाराष्ट्राच्या विधानसभेत आजचा दिवस गाजला तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) दिलखुलास भाषणाने. एकनाथ शिंदे यांनी राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीपासून आमदारांमधील नाराजी कशी वाढत गेली, याच इतिवृत्तांतच विधानसभेत सांगितला. शिंदेंनी एक एक किस्से एवढे गंमतीदार पद्धतीने सांगितले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadanvis) अनेक जण लोट पोट होऊन हसत होते. राज्यसभेत संजय पवार कसे पडले की त्यांना पाडण्यात आलं, याचंही वर्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. एवढंच नाही तर विधान परिषद (MLC Election) निवडणुकीनंतर रात्रीतून ते स्वतः सीमेबाहेर कसे पोहोचले याचंही वर्णन त्यांनी अगदी गमतीदार पद्धतीने सांगितलं. मी एक शिवसैनिक असून मोकळेपणाने सांगायला घाबरत नाही. जे घडलं ते सांगतोय, असे ते म्हणाले. अगदी अमित शहांशी झालेलं बोलणंही त्यांनी सांगितलं. हम आपके पिछे चट्टान की तरह खडे रहेंगे… हे अमित शहांचं वाक्य होतं, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे शिंदेंच्या या बंडामागे भाजपाचा मोठा हात होता हे सभागृहातच उघड झालं.
राज्यसभेविषयी बोलताना शिंदे म्हणाले…
‘ सर्व घडवणारे हे आहेत (फडणवीसांकडे हात दाखवून). कधी काय काय करतील भरवसा नाही. अरे राज्यसभेचे उमेदवार दोन होते. आमचे दोन्ही निवडून येणार होत. फुल फिल्डिंग लावली. आमची दोन्ही मते बरोबर इनटॅक्ट राहिली. थोरात साहेब म्हणाले. 42 मते घेतो. आम्ही सांगितलं 42 मतेच घ्या. 44 घेऊ नका. नंतर प्रॉब्लेम होईल पुढे. विधान परिषदपण निवडणूक आहे. ते म्हणाले नाही,42 मतेच घेतो. पण त्यांनी घेतली 44 मते. दादांनी घेतली 43 मते. बोललो आता एवढं झालं तरी आपली दुसरी सीट येऊ शकते. बघितलं साला आमचा दुसरा माणूस पडला. (अध्यक्षांकडे पाहून साला हा शब्द काढा. शब्द मागे घेतो. त्यानंतर जयंत पाटील उठले. जयंत पाटील म्हणाले, विनंती आहे शब्द मागे घेऊ नका. हे नॅचरल फ्लोमध्ये चालू दे. जे नैसर्गिक आहे ते चालू दे. त्यात आपण अडथळा करू नका. तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊ देऊ नका.) ही नैसर्गिक युतीच केली आम्ही. तुम्हालाही ती मान्य आहे….
संजय पवार कसे पडले?
राज्यसभा निवडणुकीत संजय पवार कसे पडले, हे सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ तर संजय पडला कसा? बघितलं तर आम्ही कॅलक्युलेशन केलं. आमची मते इनटॅक्ट. सुनील प्रभू आमची सर्व हुशार माणसे होती. ते म्हणाले, आपली मते बरोबर आहेत. पण फुटले कुणाचे? आता इथे कलाकार बसलेत (फडणवीसांकडे बोट दाखवून) यांनी कुणाची मते फोडली माहीतच नाही. बाकी लोकं बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला. दुसरा पडला पाहिजे होता. मी म्हटलं असं नाय… (एकच हशा) पण मी म्हणालो, दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचे गणित आपलं होतं. दोन्ही फिल्डिंग लावली (मध्येच फडणवीस म्हणाले, सगळं उघड करू नका) आमचे दोन्ही निवडून आले पाहिजे होते. राऊत साहेब पण आणि तो बिच्चारा संजय पवार. पण दुर्देवाने ती गडबड झाली.
विधानपरिषदेवेळी काय झालं?
विधान परिषद निवडणुकीवेळची स्थिती सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ दुसऱ्या दिवशी विधान परिषद होती. मला बाहेरच काढून टाकलं होतं. बोलले हा काही कामाचा नाही. काढा याला बाजूला. बरं त्या आधीच्या संजय पवारांनाही मी तीन मते बाहेरची एक्स्ट्रा आणली होती. तीन मते माझ्या ओळखीने. ती तुम्ही बघितली पण. अनिल परबांनी बघितली, तुम्ही बघितली, सुनील प्रभूंनीही बघितली. बघितली ना बाबा… कारण मार्किंग दिलं होतं त्या आमदारांना वेगळं. आमच्या आमदारांपेक्षाही वेगळं. तर विधान परिषदेत सर्व लोक बोलले काय केलं पाहिजे,. मी म्हटलं आपले शिवसेनेचे दोन्ही लोक निवडून आले पाहिजे. त्यात कॉम्प्रमाईज होता कामा नये. कारण मी गद्दार नाहीये दादा,. माझ्या ध्यानीमनी कधी माझ्या मनात येणार नाही, ‘ असं एकनाथ शिंदे म्हणाले.
आमचा बाप काढला….
एकनाथ शिंदे आणि आमदारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यावर शिवसेना नेत्यांनी टीका केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ” आमचा बाप काढला गेला. रेडा म्हणाले. अनेक वाईट शब्द काढले. मी एकदम शांत असतो. मात्र अन्याय झाल्यावर मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. त्यांना मीडियाला बोलायला सांगितले. बाप काढले, माझे वडील जिवंत आहेत. माझी आई गेली. एकदा गावी गेल्यावर उद्धव साहेबांचा फोन आला. आईने उद्धव साहेबांना सांगितले, माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळ होतो. मला खूप कष्टाने वाढवले आहे, असे आई म्हटल्याची आठवण एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितली.