मुख्यमंत्री मुंबादेवीच्या दर्शनाला, अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायक चरणी लीन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे सुद्धा उपस्थित होते.
मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरांची दारं उघडण्यात आली आहेत. कोरोना प्रकोपामुळे गेली अनेक महिने मंदिरांची दारं बंद होती. मात्र आता कोरोना नियमांचं पालन करुन भक्तांसाठी सर्व प्रार्थनास्थळं खुली करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब मुंबादेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वाडकर हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. आजपासून मंदिर आणि प्रार्थना स्थळे खुली झालेली आहेत. सर्व जनतेला, भक्तांना, विनंती आहे की आनंदी राहा सुरक्षित रहा”
नियमांचं पालन करा
कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त आणि पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली. तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड आणि तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतुक केले.
अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात पूजा केली.
यावेळी अजित पवार म्हणाले, “कोरोनाचे संकट गेले दीड वर्षे आहे. आम्हाला नाईलाजास्तव मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठ्या संख्येने जात असतात. पहिली लाट, आली दुसरी लाट, त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो. आशिर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत, अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे”.
जयंत पाटील
गेले काही काळ मंदिरं बंद होती, परंतु आजपासून आम्ही मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला आहे, असं जयंत पाटील म्हणाले. यावेळी त्यांना जिल्हा परिषद पोटनिवडणूक निकालाबाबत विचारण्यात आलं. ते म्हणाले, “महाविकास आघाडीच्या जागा वाढता आहेत यावरून स्पष्ट होतंय की भाजपचा महाराष्ट्रातील जनाधार कमी झाला आहे. काही ठिकाणी वेगवेगळे लढून देखील भाजपचा पराभव झाला आहे. आम्ही सर्वजण एकत्र राहण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेत आहोत. आमची कायम भूमिका आहे एकत्र लढलं पाहिजे”.
संबंधित बातम्या