मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे. असं असताना आता कर्नाटक सरकारने (Karnataka Government) मराठी संस्था बंदीचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आहे. हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलीय. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कर्नाटकात मराठी भाषिकांवर मोठा अन्याय होत असल्याचा आरोपही केला आहे.
कर्नाटकात मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होत आहे. आता हा अन्याय मर्यादेपलीकडे जात आहे. भाषेवर प्रेम करणारे लोक देशभर असतात. कर्नाटक राज्यात मराठी भाषा आणि महाराष्ट्राला विरोध होत असताना आता यापलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाही करण्यात आली. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री ही छोटी-मोठी घटना असल्याचे म्हणत आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन यावर तात्काळ माफी मागावी अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. नवाब मलिक यांची पत्रकार परिषद https://t.co/8mkx7fSSYf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 21, 2021
कर्नाटकात मराठी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत मलिक यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय व इतर लोकांच्या वेगवेगळ्या संघटना असल्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले. देशाच्या प्रत्येक नागरिकाला कशापद्धतीने जगायचे हा मूलभूत अधिकार असताना यावर गदा आणण्याचे काम कर्नाटक सरकार करत असेल तर मराठी भाषिक जनता ते सहन करणार नाही. मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी तात्काळ स्थगित करावा, असं मलिक म्हणाले.
दरम्यान, बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बेळगावसह राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर बोलताना बोम्मई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर सांगोळी रायण्णा आणि राणी चेनम्मा यांनी देशाच्या गौरवासाठी आणि रक्षणासाठी केलेलं कार्य महान आहे. दोघेही आमच्यासाठी आदर्शच आहे. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांच्या आदर्शावरच आमची वाटचाल सुरू आहे. त्यांचा आदर राखणं हे प्रत्येकाचं काम आहे. मात्र काही समाजकंटकांकडून वाद निर्माण केला जात आहे. भाषा आणि इतर मुद्द्यांवरून हे लोक फूट पाडत आहे.
इतर बातम्या :