मुली जिंकल्या, मुलं हरली, दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचे निकाल काय?
विजयकुमार गावित यांची कन्या, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या आणि के सी पाडवी यांची बहीण अशा 'लेकीं'चा विजय झाला, तर विजयकुमार गावित यांचा पुतण्या, राजेंद्रकुमार गावित यांचा मुलगा अशा 'सुपुत्रां'ना पराभवाचा धक्का बसला.
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये आमदार विजयकुमार गावित, खासदार हीना गावित, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार राजेंद्रकुमार गावित, भाजपचे माजी विरोधी पक्ष नेते अनिल निदान यासारख्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
विजयकुमार गावित यांची कन्या, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कन्या आणि के सी पाडवी यांची बहीण अशा ‘लेकीं’चा विजय झाला, तर विजयकुमार गावित यांचा पुतण्या, राजेंद्रकुमार गावित यांचा मुलगा अशा ‘सुपुत्रां’ना पराभवाचा धक्का बसला.
महत्त्वाच्या लढतीत कुठे कोण कोण जिंकलं?
नंदुरबार – माजी मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित विजयी
नंदुरबार – विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित यांचा पराभव
नंदुरबार – आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची बहीण गीता कागडा विजयी
धुळे – गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुलगी धरती देवरे विजयी
पालघर – शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित पराभूत
गावितांच्या लेकीचा विजय
भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या, तर भाजप खासदार डॉ. हीना गावित यांची धाकटी बहीण डॉ. सुप्रिया गावित या नंदुरबारमधील कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. 1326 मतांनी सुप्रिया गावित यांनी विजय मिळवला. तर शिवसेना उमेदवार आशा पवार पराभूत झाल्या.
गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या कन्येचा पुन्हा विजय
गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या धुळे जिल्ह्यातील लामकने गटातून विजयी झाली आहे. धरती देवरे लामकने गटातून भाजपकडून निवडणूक लढवत होत्या. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर उर्फ चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला आता 1 जागेची आवश्यकता आहे.
आदिवासी मंत्र्यांच्या बहिणीची बाजी
आदिवासी विकास मंत्री आणि अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसचे दोन वेळ आमदार के. सी. पाडवी यांच्या बहिणीचाही विजय झाला. नंदुरबारमधील खापर गटातून काँग्रेसकडून गीता कागडा यांना उमेदवारी देण्यात आली होती.
सेना खासदाराच्या लेकाला पराभवाचा धक्का
शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला. डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गटात भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी रोहित गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती.
गावितांचा पुतण्या हरला
भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या तर खासदार डॉ. हीना गावित यांच्या लहान बहीण डॉ. सुप्रिया गावित कोळदा गटातून विजयी झाल्या आहेत. मात्र गावित यांचे पुतणे पंकज गावित यांचा पराभव झाला. शिवसेना नेते आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी याचा मुलगा राम रघुवंशी यांना नंदुरबारमधील कोपर्ली गटातून शिवसेनेकडून विजय मिळवला.
संबंधित बातम्या :
स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?