आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी सरकार कोसळेल?; नाथाभाऊंचं लॉजिक काय?
आता पन्नास खोके घेतले आहेत. मग कशाला पाहिजे मंत्रिपद? असे एकनाथ शिंदे त्याचा कानात सांगत आहेत. त्यामुळे आता सर्व गुपचूप बसले असल्याची खोचक टीकाही नाथाभाऊंनी केली.
अनिल केराळे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव: दिपक केसरकर (deepak kesarkar) हे अजून दोन वर्ष शिक्षण मंत्री राहतील, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केलं आहे. पाटील यांनी हे विधान करून राज्यातील शिंदे सरकार दोन वर्ष टिकणार असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीचेच नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी राज्यातील शिंदे सरकारबाबत वेगळीच भविष्यवाणी केली आहे. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर दुसऱ्याच दिवशी राज्यातील शिंदे सरकार कोसळेल, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. शिंदे गटाचे 50 आमदार अस्वस्थ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ खडसे बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
मंत्रिपद मिळण्याबाबत आपसातल्या भानगडीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. आता जर मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दुसऱ्या दिवशी हे सरकार कोसळेल. त्यामुळे हे सरकार कोसळण्याची वेळ येईल त्याच्या महिनाभर अगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांमध्येच मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. मंत्रिपदासाठी सुरुवातीला अनेक गाड्या भरून मुंबईकडे गेल्या.
मात्र आता पन्नास खोके घेतले आहेत. मग कशाला पाहिजे मंत्रिपद? असे एकनाथ शिंदे त्याचा कानात सांगत आहेत. त्यामुळे आता सर्व गुपचूप बसले असल्याची खोचक टीकाही नाथाभाऊंनी केली.
जे उद्धव ठाकरेंच्या घराण्यात वर्षानुवर्ष राहिले तेच आता उद्धव ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यांना अक्कल शिकवायला लागले आहेत. गुलाबराव पाटील यांनी तर जाहीर भाषणं केली. गद्दारी माझ्या रक्तात नाही.
मी असं केलं तर दोन बापाचा होईल अशी भाषणं गुलाबरावांनी केली. पक्ष मी पण बदलला पण मी कुठल्या पदावर राहिलो नाही. ज्या उद्धव ठाकरेंमुळे तुम्ही निवडून आलात त्यांच्याशी असं करणं योग्य नाही, असंही खडसे म्हणाले.