Vidhan Parishad Election 2022: कोण आहेत उमा खापरे, श्रीकांत भारतीय, ज्यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिलीय

| Updated on: Jun 08, 2022 | 12:27 PM

Vidhan Sabha Election 2022: उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

Vidhan Parishad Election 2022: कोण आहेत उमा खापरे, श्रीकांत भारतीय, ज्यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिलीय
कोण आहेत उमा खापरे, श्रीकांत भारतीय, ज्यांची नावं भाजपकडून विधान परिषदेसाठी निश्चित मानली जातायत?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यातील 10 विधान परिषदेच्यान निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत भाजप (bjp) पाच जागा लढवणार आहे. उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय (shrikant bhartiya) यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे. उमा खापरे (uma khapre) आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, या दोन्ही नेत्यांना भाजपने संधी नाकारली आहे. तर, मित्र पक्षाचे नेते विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचाही विधान परिषदेतील पत्ता कट करण्यात आला आहे. बड्या नेत्यांना डावलत भाजपने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय कोण आहेत यावर टाकलेला हा प्रकाश.

कोण आहेत उमा खापरे?

उमा खापरे या भाजपच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपमध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपमधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात.

हे सुद्धा वाचा

उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. 2001-2002 मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.

दिपाली सय्यद यांच्यावरील टीकेने प्रसिद्धी झोतात

दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना नेते दिपाली सय्यद आणि उमा खापरे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. मोदींवर आक्षेपार्ह टीका केली तर घरात घुसून चोप देऊ, असं जाहीर विधान खापरे यांनी केलं होतं. त्यामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या.

फडणवीसांचे ओएसडी ते विधान परिषदेचे उमेदवार

विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपचच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.