“कुणी असो किंवा नसो, राज्याचं अर्थचक्र चालावं म्हणून कोव्हिडमध्येही मंत्रालयातील कार्यालय सुरु”, दादांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांना टोमणा
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी एका लेखाच्या माध्यमातून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण याच लेखात त्यांनी दादांच्या कामाचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना टोमणा मारलाय.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी आज अजितदादांवर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एका लेखाच्या माध्यमातून अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण याच लेखात त्यांनी दादांच्या कामाचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना टोमणा मारलाय. कुणी असो किंवा नसो, महाराष्ट्राचं अर्थचक्र चालावं म्हणून कोव्हिड काळातही दादांचं मंत्रालयातील कार्यालय सुरु असल्याचं सांगत त्यांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे होता हे जवळपास निश्चित…!
बोले तैसा चाले..
अलीकडच्या राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान सहन करतील, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील पण दिलेला शब्द पाळणारच, असे नेते बोटावर मोजण्याइतकेच आहेत. त्यापैकीच आवर्जून नाव घ्यावं ते अजितदादांचं! बोले तैसा चाले… ही म्हण लिहिणाऱ्याने त्या काळात अजित दादांसारख्याच कुणालातरी डोळ्यासमोर ठेवून लिहिलेली असावी, याची प्रचिती मला कित्येक अनुभवातून आली आहे. माझ्या राजकीय जडणघडणीत, आज मी आहे त्या पदासहित आजवर मी जी कामे करू शकलो त्या सर्वांमध्ये दादांचे योगदान मला ती प्रचिती व अनुभूती आजवर देत आले आहे, अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.
कुणी असो किंवा नसो दादांचं काम अविरत सुरु, धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा?
लॉकडाऊन काळात सगळं बंद असताना सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत दादांचे मंत्रालयातील कार्यालय सुरू असायचे. स्वतः दादा बसून असायचे, महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून कोणी असो नसो, दादांचे कार्य मात्र अविरत सुरू असायचे, धनंजय मुंडे यांच्या या एका वाक्यातून त्यांचा रोख मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं जाणवतं.
पुढे बोलताना ते म्हणतात, “दादांची केबिन सकाळपासून अगदी मध्यरात्री पर्यंत सुरू असते, दादांच्या अविरत कार्यशैलीची हीच ती प्रेरणा आहे जी माझ्यासारखे असंख्य तरुण राजकारणात नव्याने काम सुरू करताना शिकायचा प्रयत्न करतात!”
वक्तशीर अजितदादा
आम्ही मुंडे कोणत्याही कार्यक्रमाला कधी वेळेवर जात नाहीत अशी चर्चा असते, दादांच्या बाबतीत हे उलट आहे, कोणी नाही आलं तरी चालेल पण दादा कार्यक्रम, बैठक किंवा अगदी प्रचारसभा का असेना दिलेल्या वेळीच हजर होणार! बऱ्याचदा दादा लवकर आल्याने आमची तारांबळ सुद्धा होत असते.
परळीला कोट्यवधींचा विकासनिधी
दादा पहिल्यांदा आमच्या परळीला आले तेव्हा दिलेला शब्द त्यांनी एक क्षणात पूर्ण केला आणि कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी त्यांनी परळी शहराला दिला. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवला. परळीला पाणी देणारे ते भगीरथ ठरले. दादा दिलेल्या शब्दावर किती ठाम असतात याची प्रचिती त्या दिवशी मला प्रथमच आली. आजही आमच्या परळीतील नगरोत्थान योजनेसाठी वाढीव निधी मागताच दादांनी नवीन प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
दादांच्या अंगी स्पष्ट आणि सडेतोड वाणी
दादांच्या अंगी असलेल्या स्पष्ट व सडेतोड वाणीमुळे आणि आजकाल सोशल मीडियाच्या वाढलेल्या अति वापरामुळे दादांच्या अंगी असलेल्या सकारात्मक सद्गुणांना बाजूला ठेऊन त्यांच्यावरील क्रीटीसीजमचा अधिक उदो उदो केला जातो, याचे वाईट वाटते. पण कोणत्याही टीकेमुळे खचतील ते पवार कसले?
कामाचा धडाका, लोकांशी जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड म्हणजे अजितदादा
माझ्यासारख्या राजकारणात व समाजकारणात काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याला अजित दादांसारख्या माणसाची पाठराखण मिळणे ही त्यातल्या त्यात एक मोठी गोष्ट आहे. कारण ‘अनंत टीकेचे धनी’ अशीच आमच्या दोघांची ओळख अनेकवेळा माध्यमांसमोर मांडली जाते. दादांचा कामे करण्याचा धडाका, लोकांशी जनसंपर्क, प्रशासनावरील मजबूत पकड, त्यांच्यातील धैर्य आणि संयम या अशा एक ना अनेक गोष्टी सांगता येतील, ज्या मी त्यांच्याकडे बघून शिकायचा प्रयत्न करतो आहे. सबंध राज्याने कोविड काळात या गोष्टी पाहिल्या व अनुभवल्या आहेत.
दादा म्हटलं की आठवतात गेल्या दहा वर्षातल्या अनेक आठवणी
दादा म्हटलं की आठवतात गेल्या दहा वर्षातल्या अनेक आठवणी, दादांनी किती संघर्ष केला, दादांच्या व्यक्तिमत्वावर विरोधकांकडून झालेल्या टीका, परंतु या टीकांना भीक न घालता दादांनी संकट काळात राज्याच्या हिताचे निर्णय घेऊन दाखवले हे शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राने पाहिलं.
याचमुळे दादा आज महाराष्ट्राचे दादा आहेत!
दादांच्या कामांचा धडाका, प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड याची वेळोवेळी अनुभूती येत असते. मागील काही दिवसांपूर्वी दादा आमच्या बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी केवळ काही किलोमीटर प्रवासात बीड शहरातील स्वच्छतेवर बोट ठेवले आणि बीडच्या मुख्याधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुसऱ्याच दिवशी सबंध बीड शहर चकाचक झाले. दौऱ्यात असताना इतक्या बारकाईने निरीक्षण करणे, त्याचा संदर्भ लगेच समोरच्या बैठकीत ठेऊन ते काम करवून घेणे या बाबींमुळेच कदाचित दादा आज महाराष्ट्राचे दादा आहेत!
दादा आणि मी या नात्यामध्ये एक मजबूत धागा म्हणजे शरद पवार
दादा आणि मी या नात्यामध्ये एक मजबूत धागा आहे त्या धाग्याचं नाव आदरणीय पवार साहेब… जोपर्यंत साहेब आमच्या पाठीशी आहेत, कोणतेही षडयंत्र किंवा कोणतीही टीका हाणून पाडायची ताकत दादांमध्ये आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात, गाव-खेड्यात दादांना मानणारा युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. घड्याळापेक्षा जास्त वेळेवर चालणारे दादा उगाच कुणाला गप्पा मार्ट बसलेले कुणीही कधी पाहीले नाहीत, मात्र कार्यालयात भेटायला आलेल्या प्रत्येकाला वेळ देऊन त्याचे समाधान करण्याकडे दादांचा कटाक्ष असतो. दोन बैठकांच्या मधल्या वेळेत अधिकाधिक लोकांना भेटून त्यांना ताटकळत न ठेवणे व वेळेचा सदुपयोग करणे असा दुहेरी योग दादा साधतात.
दादा आपण माझं प्रेरणास्थान
आदरणीय दादा, आपण माझ्यासारख्या अनेकांचे प्रेरणास्थान आहात, आपण करत असलेलं काम, कोरोना सारख्या महामारी मध्ये आपण राज्यातील जनतेला दिलेला आधार आम्ही कधीही विसरणार नाही, तुम्ही मंत्रालयात बसून रोज सकाळच्या सात वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत लोकांसाठी केलेलं काम आम्ही कधीच विसरणार नाही; महामारी आणि आर्थिक संकट अशा दुहेरी कात्रीत असताना देखील अत्यंत संयमाने व धैर्याने तुम्ही आम्हाला सांभाळलत आणि हे करत असताना तुमचा संवेदनशील स्वभाव थोडाही डगमगू दिला नाहीत… म्हणूनच कदाचित ‘बोले तैसा चाले’ ही म्हण तुम्हाला तंतोतंत लागू होत असावी. पण या काळात तुम्ही स्वतःची काळजी देखील घ्या…
अजितदादा पवार यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार जोपासत, दादांच्या हातून नेहमीप्रमाणेच कायम सत्कार्य घडो…. दिलेला शब्द पाळणारच याप्रमाणे आम्हा कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या दादांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू वैद्यनाथकडे दादांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असं सरतेशेवटी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Minister Dhananjay munde greets DCM Ajit Pawar on Birthday
हे ही वाचा :
अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा