विधानसभेला दाखवून दिलंत, राष्ट्रवादीवर तुमचं मनापासून प्रेम, सिन्नरकरांना लवकरच पाणी देणार : जयंत पाटील
सिन्नरला पाण्याचा प्रश्न भेडसावत असून पवारसाहेबांवर,राष्ट्रवादीवर सिन्नरकरांनी जे भरभरून प्रेम केले त्याचा उतराई व्हावा म्हणून लवकरच या भागाला पाणी देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
नाशिक : सिन्नरला पाण्याचा प्रश्न भेडसावत असून पवारसाहेबांवर,राष्ट्रवादीवर सिन्नरकरांनी जे भरभरून प्रेम केले त्याचा उतराई व्हावा म्हणून लवकरच या भागाला पाणी देणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. माणिकराव कोकाटे यांनी या भागाचा विकास करण्याचा ध्यास घेतला आहे, शासनातर्फे त्यांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असा शब्दही जयंत पाटील यांनी दिला.
राष्ट्रवादीची संवाद यात्रा सध्या राज्यात सुरु आहे. काल राष्ट्रवादीची यात्रा सिन्नरमध्ये होती. लोकांनीही या यात्रेला प्रचंड गर्दी केली होती. सिन्नरच्या भाषणात मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी सिन्नरकरांचं राष्ट्रवादीवर असलेलं प्रेम जयंत पाटील यांनी विषद केलं.
सिन्नरकरांच्या विश्वासाला माणिकराव कोकाटे पात्र ठरतायत
सिन्नरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकणार हे मला इथे प्रचाराला आलो तेव्हाच कळलं होतं. सिन्नरकरांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासास ते पात्र ठरत आहेत. सिन्नरचा झपाट्याने होणार विकास हे त्याचे उदाहरण आहे असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादीवरच्या प्रेमापोटी अन्याय होत असतानाही कार्यकर्ते पक्षात
राष्ट्रवादीकडे विधानसभा मतदारसंघ नाही तिथे कार्यकर्ते अनेक अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहेत हे मी संपूर्ण महाराष्ट्रभर संवाद यात्रा काढत असताना पाहत आहे. त्यांना न्याय मिळावा, यासाठी त्यांच्यापर्यंत थेट जाऊन त्यांच्याशी संवाद साधत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
सरकार चांगलं काम करतंय म्हणून मंत्र्यांना बदनाम केलं जातंय
महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा झोकून काम करायला सुरुवात केली होती मात्र कोविड आला आणि राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून राज्याची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. राज्य सरकार प्रत्येक समाज घटकांसाठी काम करत आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण या सर्व गोष्टींच्या बाजूने भूमिका मांडत आहे. सरकार चांगलं काम करतंय, सरकारची लोकप्रियता वाढली आहे म्हणून मंत्र्यांना बदनाम केले जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला.
विविध नेते पदाधिकारी उपस्थित
यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी अध्यक्ष विद्यासागर घुगे, जिल्हा युवक अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष नंदन भास्करे, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, युवक अध्यक्ष जयराम शिंदे, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(Maharashtra Minister Jayant patil Says We will water Sinnar Over NCp Sanvad Yatra)
हे ही वाचा :
तुळजाभवानी नवरात्रोत्सव; रोज 15 हजार भाविकांनाच दर्शन, पुजारी आणि सेवेकरींसाठीही नियम!
प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत म्हणजे एकप्रकारची टिंगल, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर