दोन वर्षापूर्वी जे घडलं तेच आता घडणार?; कोणत्या पक्षाला लागणार सुरुंग?
दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमधून धडा घेऊन राजकीय पक्ष ही खबरदारी घेत असल्याचे बोललं जात आहे. पण दोन वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
Maharashtra MLC Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत 12 वा खेळाडू उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत एका उमेदवाराची विकेट जाणार आहे. पण ती कुणाची जाणार? सत्ताधाऱ्यांमधील एकाची की विरोधकांमधील एकाची? अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसे झाल्यास कोणत्या पक्षाला सुरुंग लागणार? अशीही चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे फिरल्यानंतर राज्यात काय होणार? दोन वर्षांपूर्वी जे घडलं तेच आता होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यात भाजपचे पाच, अजितदादा गटाचे दोन, शिंदे गटाचे दोन, आणि ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक एक उमेदवार आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली होती. या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटाने खबरदारी म्हणून आपपल्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवले होते.
‘त्या’ भीतीने हॉटेल पॉलिटिक्स
विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या हॉटेल पॉलिटिक्सची सातत्याने चर्चा पाहायला मिळत आहे. भाजपने कफ परेड येथील हॉटेलमध्ये दोन दिवस आमदारांना ठेवलं. तर शिंदे गटाने वांद्रे येथील तर ठाकरे गटाने परळ येथील हॉटेलात आमदारांची बडदास्त ठेवली. हे आमदार कुणाच्याही संपर्कात येऊ नये, कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि क्रॉस वोटिंग करू नये म्हणून सर्वच पक्षांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींमधून धडा घेऊन राजकीय पक्ष ही खबरदारी घेत असल्याचे बोललं जात आहे. पण दोन वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.
दोन वर्षापूर्वी काय घडलं?
दोन वर्षांपूर्वी 20 जून रोजी विधान परिषदेचे मतदान पार पडले होते. हे मतदान संपल्यानंतर त्या रात्रीच एकनाथ शिंदे 16 आमदारांसह नॉट रिचेबल झाले होते. त्या रात्री ते सूरतमध्ये गेले होते. शिंदेंच्या बंडाची कुणकुण लागताच महाराष्ट्रात रात्री उशिरा राजकीय भूकंप झाला. त्यानंतर पुढील 10 दिवस राज्यात महाराजकीय नाट्य सुरु होतं. या संपूर्ण घडामोडीत शिंदेसह 40 आमदारांनी बंड केलं, शिवाय 10 अपक्षही यात सहभागी होते. हे सर्व आमदार सूरतहून गुवाहाटी, पुढे गोवामार्गे राज्यात थेट सत्तास्थापनासाठी आले.
29 जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यममंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील अस्थिर राजकारणावर पडदा पडला.
एकनाश शिंदेंनी केलेला बंड हा आतापर्यंतच्या बंडांमधील सर्वात मोठं बंड मानला जातं. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर केवळ शिवसेनाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. यादरम्यान, शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसोबत एक महाशक्ती आहे, असा उल्लेख विरोधकांकडून वारंवार केला जात होता. तसेच, यादरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमागे भाजप असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरूच होत्या. कालांतरानं शिंदेंना भाजपचीच साथ असल्याचं स्पष्टही झालं.
आता भीती कसली?
दोन वर्षापूर्वी मोदी लाट होती. भाजपमध्ये गेल्यावर हमखास निवडून येऊ शकतो असं समजलं जात होतं. राज्यात भाजपचं वर्चस्व होतं. भाजपचीच सत्ता येणार अशी हवा होती. त्यामुळेच ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील लोक भाजपमध्ये यायला उत्सुक होते. भाजपची हवा असल्यानेच शिंदे यांनी आधी बंड केलं. त्यानंतर अजितदादांनीही बंड केलं होतं. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने हे चित्र पालटलं आहे. या निवडणुकीत महायुतीचा प्रचंड पराभव झाला. भाजपलाही मोठा फटका बसला. त्यामुळे भाजप आणि मोदी यांची हवा ओसरल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने आमदारांना भवितव्याची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर अस्वस्थ आमदार बंड करून कुठे जाणार? अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून तसे वारंवार संकेतही देण्यात आले आहेत. तर, क्रॉस व्होटिंग झाल्यास कुणाची मते फुटणार? कोणत्या पक्षाला फटका बसणार? हे सुद्धा आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळेच त्या विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेला खेळ या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.