MLC Election 2024 : बच्चू कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं कोणाला आणि का करणार मतदान?
"मी गोरगरीबांच्या डोक्यातला आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या मनात काय चालतं? एवढं डोक चालवत नाही. आज संध्याकाळपर्यंत समजेल कोण पडणार? कोण जिंकणार? काही अदृश्य शक्ती काम करणार नाही"
आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीकडे राज्यातील जनतेच लक्ष लागलं आहे. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. एक उमेदवार पडणार एवढं निश्चित. पण तो कुठल्या बाजूचा? याचीच उत्सुक्ता आहे. कारण कुठल्या पक्षाची मत फुटतात? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करण्याआधी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. आपण कोणाला आणि का मतदान करणार? ते त्यांनी स्पष्ट केलं.
“आम्ही दोन वर्ष शिंदे साहेबांसोबत आहोत. आताही त्यांच्यासोबत आहे. त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला. मी स्वत: आणि राजकुमार पटेल आम्ही दोघे शिंदे साहेबांसोबत जाऊन मतदान करणार आहोत” असं बच्चू कडू यांनी सांगितलं. 12 उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे मत फुटण्याची शक्यता आहे, त्या प्रश्नावर बच्चू कडू यांनी “एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच एकही मत फुटणार नाही. बाकीच्यांच मला सांगता येत नाही” असं उत्तर दिलं.
‘मी माझी गॅरेटी घेतो’
विरोधकांची मत फुटतील अशी चर्चा आहे, त्यावर बच्चू कडू म्हणाले की, “मी माझी गॅरेटी घेतो. राजकुमार आणि बच्चू कडू दोघांच मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार. भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोघांना आम्ही मतदान करणार. दोघे विदर्भाचेच आहेत” “मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला. आम्ही कर्तव्य बजावणार. या सरकारमध्ये खूप निधी मिळाला. त्याची जाण ठेऊन आम्ही मतदान करणार. कोण हरणार? कोण जिंकणार? हे आत्ताच सांगू शकत नाही” असं बच्चू कडू म्हणाले.
‘काही अदृश्य शक्ती काम करणार नाही’
“मी गोरगरीबांच्या डोक्यातला आवाज ऐकणारा माणूस आहे. एवढ्या मोठ्या नेत्यांच्या मनात काय चालतं? एवढं डोक चालवत नाही. आज संध्याकाळपर्यंत समजेल कोण पडणार? कोण जिंकणार? काही अदृश्य शक्ती काम करणार नाही, शिंदेचे दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी निवडून येतील” असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.