मुंबईः महाराष्ट्र सरकारच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Assembly Monsoon Session) आज दुसऱ्या दिवशीदेखील विरोधकांनी सरकारविरोधात आंदोलनाचा सूर कायम ठेवला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी ईडी सरकार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील बंडखोर मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानभवनातील पायऱ्यांवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शिंदे सरकारविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, नितीन राऊत, नाना पटोले आदी उपस्थित होते. मराठवाड्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना सरकारची मदत मिळाली पाहिजे, अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीतील नेते आज एकत्र आले. यावेळी सरकारविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, ईडी सरकार हाय हाय , लोकशाहीचा खून करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, खोके देऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो आदी घोषणा करण्यात आल्या. यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह मविआतील नेत्यांचा समावेश होता.
Day 2.
DCM @Dev_Fadnavis reaches Vidhan Bhavan, Mumbai.#MonsoonSession #IndiaAt75 #DevendraFadnavis pic.twitter.com/blE1pYrS3R— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) August 18, 2022
महाराष्ट्रातील नव्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे हे पहिलेच पावसाळी अधिवेशन आहे. काल पहिल्या दिवशी बुधवारी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. राज्यातील नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली. महापालिकांच्या क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकासाकरिता तसेच नगरपालिकांसाठी विशेष अनुदान म्हणून 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुरवणी मागण्यांमध्ये सहकार, पणन, वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम, सामाजिक न्याय, सार्वजनिक आरोग्य, गृह, नगरविकास महिला आणि बालविकास तसेच ग्रामविकास या खात्यांसाठीही तरतूद करण्यात आली. आता अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे सरकारतर्फे कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान आज विधानभवन परिसरात अधिवेशनासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्याविरोधातील तक्रारीवर प्रतिक्रिया दिली. स्वातंत्र्यदिना निमित्त जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर आगाराची एस टी बस चालवली. मात्र एसटी चालवण्याचा अनुभव नसताना, तसा परवाना नसतानाही बेकायदेशीर रित्या वाहन चालवल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, अशा प्रकारे तक्रार करून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. माझ्याकडे सर्व परवाने असून मी काहीही चूक केलेली नाहीये. उलट मी बस चालवल्यावर चांगल्या प्रतिक्रिया आल्या. तरीही मी दोषी आढळल्यास कारवाई अवश्य करावी…