मुंबईः पराक्रमाच्या बाबतीत मराठ्यांना जगात तोड नाही, असं खुद्द औरंगजेबानं मान्य केलं होतं. पण मराठ्यांच्या (Maratha) भूमीत दुहीची बिजं खडकावर टाकली तरी ती अख्खी दौलत तबाह करून टाकते… याच दुहीच्या शापाला गाढुयात, आपण एकत्र येऊयात… असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युती करत आहोत, अशी आज घोषणा केली. मराठा संघटना आणि नेत्यांचा भाजपावरील वाढता विश्वास पाहता शिवसेनेने मराठ्यांचं मोठं संघटन हाताशी धरत भाजपविरोधात मोठी खेळी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय अस्तित्वच संपुष्टात आलेल्या शिवसेनेला आता लहान लहान पक्षांना हाताशी धरतच आपलं साम्राज्य वाढवावं लागणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात ठाकरे घराणं, पक्षाचं चिन्ह, पक्षाच्या अस्तित्वावरच शिंदे गटाकडून दावा ठोकला जात असताना संभाजी ब्रिगेडला हाताशी धरून मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाला आपल्याकडे खेचण्याची नवी खेळी उद्धव ठाकरे यांनी खेळली आहे. मराठा समाजाला बगल देत बहुजन समाजाला आपलंसं करण्याची आतापर्यंतची शिवसेनेची भूमिका राहिलीय. याच भूमिकेला छेद देत उद्धव ठाकरेंनी वेगळी रणनीती आखलीय, त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकुयात-
शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं असलं तरीही सध्याच्या घडीला शिवसेनेसमोरील सर्वात मोठं आव्हान म्हणजे मुंबई महापालिकेतील सत्ता वाचवणं. भाजपने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच नियुक्त्या केल्यात. यात ओबीसी चेहरा असलेल्या चंद्रशेखर बावन्नकुळे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद दिलंय. तर आशिष शेलार या मराठा चेहऱ्याला मुंबईचा अध्यक्ष केलंय. शेलारांच्या माध्यमातून भाजपने मराठा व्होट बँकेची सोय कील आहे. त्यामुळे मुंबईतील हा मराठा मतदानाचं ध्रुवीकरण करण्यासाठी शिवसेनेनं आता संभाजी ब्रिगेडला हाताशी धरलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वात मोठी व्होट बँक होती. मात्र मराठा आरक्षणाची मागणी लावून धरल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजालाही आपलंसं केलं होतं. छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेवर नियुक्ती देत भाजपने मराठा मतदारांचे ध्रुवीकरण केले. त्यामुळे शिवसेनेनंही आपली तत्त्व बाजूला ठेवत मराठा समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहेत.
भाजप, बाळासाहेब ठाकरे- आनंद दिघेंचं नाव घेणारी शिंदेसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेवर कोंडीत पकडलंय. सर्व धर्म समभावाची परंपरा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केल्यानंतर शिवसेनेत हिंदुत्व राहिलेलंच नाही, अशी टीका केली जातेय. त्यामुळे आता मराठा कार्ड हाती धरून राजकारण करण्याची रणनीती शिवसेनेनं आखलेली दिसून येतेय.
शिवसेनेचा इतिहास पाहता बहुजन समाजातील लोकांनाच त्यांनी पाठबळ दिलंय. मराठ्यांना बाजूला सारून बहुजन समाजातील माळी, साळी, कोळी आदी १२ बलुतेदारांना पुढे आणण्याचं काम शिवसेनेनं केलं. बाळासाहेब ठाकरेंचा हाच वसा उद्धव ठाकरेंनी घेतलाय. मात्र आता पक्षाचं अस्तित्वच धोक्यात आल्यानं मराठा समाजातील संघटनेनं शिवसेनेला पाठबळ दिलंय. पण राज्यभर पसरलेला मराठा समाज शिवसेनेला कितपत पाठिंबा देणार, हाही प्रश्न आहेच.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मराठा आमदारांमुळे शिवसेनेला मराठा मतदारांची उणीव मोठ्या प्रमाणावर भासणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या मदतीने हे नुकसान भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.