मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने महाविकास आघाडीकडील 50 आमदार फोडल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारेंसमोर बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान आहे. त्यातही शिवसेनेच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई संबंधी याचिका प्रलंबित असताना राज्यपाल फ्लोअर टेस्टचा आदेश कसा देऊ शकतात, असा सवाल करत शिवसेनेनं कोर्टात धाव घेतली आहे. राज्यपालांचा हा आदेश बेकायदेशीर असून बहुमत चाचणी रोखली जावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या याचिकेवर संध्याकाळी 5 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. याच याचिकेच्या संदर्भाने सध्या महाराष्ट्रातील सत्तानाट्यात उद्भवलेल्या पाच महत्त्वाच्या मुद्दयांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. ते पाच मुद्दे जाणून घेऊयात-
- शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेची नोटीस देण्यात आलीये, हे प्रकरण आधीच सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. असं असताना फ्लोअर टेस्ट घेता येणार नाही असा शिवसेनेचा दावा आहे. शिवसेनेची ही मागणी कोर्टात फेटाळली जाऊ शकते किंवा मान्यही केली जाऊ शकते.
- राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्याचे अधिकार नाहीत. निवडणूक झाल्यानंतरच सरकार स्थापन करताना राज्यपालांची भूमिका महत्वाची असते. तरीही राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. या मुद्द्यातील कायदेशीर पेचही आजच्या सुनावणीत स्पष्ट होतील.
- कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशनाचा निर्णय घ्यायचा असतो. परंतु इथे मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन बोलवले नसतानाही राज्यपालांनी फ्लोर टेस्टचा निर्णय घेतलाय. राज्यपालांकडे असे अधिकार आहेत का यावर आज सुप्रीम कोर्टात निर्णय दिला जाईल.
- शिवसेनेनं पक्षाचे गटनेता म्हणून अजय चौधरी यांना नेमले आहे. परंतु गटनेता एकनाथ शिंदे आहेत असा दुसऱ्या गटाचा दावा आहे.
- उद्या विशेष अधिवेशनात ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायची वेळ आली तरी शिवसेनेत कुणाचा व्हिप लागू होणार हाही मुद्दा आहे. शिवसेनेचा गटनेता आणि प्रतोद खरा की बंडखोरांचा गटनेता आणि प्रतोद खरा, हा मुद्दाही संध्याकाळी होणाऱ्या सुनावणीत निकाली लागू शकतो. शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी व्हीप जारी केला तर एकनाथ शिंदे आणि समर्थकांना तो लागू होईल का, असा प्रश्न आहे. किंवा प्रभू यांच्या व्हीपला शिंदे समर्थकांकडून याला पुन्हा विरोध होईल का, हादेखील प्रश्न आहे.