Devendra Fadnavis : लाडक्या बहिण योजनेवरुन मंत्रिमंडळात राडा का? मध्यस्थीच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…
Devendra Fadnavis : "मोठा भाऊ कोण? लहान भाऊ कोण? यांच्याशी बहिणीला देणघेणं नाही. भावांनी आपल्याला लक्षात ठेवलं याचा बहिणींना आनंद आहे. राखी, भाऊबीज असेल, ओवाळणी स्वरुपात दिलं. भावांनी लक्षात ठेवंल यावर बहिणी खुश आहेत. कोण मोठं, कोण लहान याच्याशी देणघेण नाही"
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरुन महायुती सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई रंगल्याच्या बातम्यात येत आहेत. त्यावर आज भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते. TV9 मराठीचे मॅनेजिंग एडीटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. बहिणींचे लाडके देवा भाऊ, असे पोस्टर बारामतीमध्ये लागले आहेत या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला अनेक वर्ष लोक देवा भाऊ म्हणतात. जेव्हापासून लाडकी बहिण योजना सुरु झाली, तेव्हापासून जास्त प्रकर्षाने देवा भाऊ नाव पुढे आलं, मला ते आवडतं. देवा भाऊ नाव जास्त जवळच वाटतं” बारामतीला पोस्टर लागले ही श्रेयवादाची लढाई नाही ना? असा प्रश्न विचारला.
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही श्रेयवादाची लढाई नाही. लाडकी बहीण योजना तिन्ही पक्षाच्या सरकारने आणली. कुठल्याही सरकारने कुठलीही योजना आणली, तरी मुख्यमंत्र्यांच श्रेय असतं. तिन्ही पक्ष आपपाल्या पद्धतीने प्रचार करत आहेत. खरं श्रेय बहिणींच आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, या दृष्टीने तिन्ही पक्ष प्रचार करतायत”
मंत्रिमंडळातील वादाच्या प्रश्नावर फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहिण योजनेच्या श्रेयवादावरुन काल मंत्रिमंडळात वाद झाला. तुम्हाला मध्यस्थी करावी लागली, असं ऐकलं. “मंत्रिमंडळात कुठलाही राडा झालेला नाही. योजनेच ब्रँडिंग, जाहीरात कशी करायची, याबद्दल चर्चा झाली. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार सुरु आहे. कॉमन ब्रँडिंग झालं पाहिजे. जाहीरात करताना तिघांच्या होर्डिंगमधून सारखा संदेश गेला पाहिजे यावर चर्चा झाली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘
लाडक्या बहिणीचा मोठा भाऊ कोण?
तुमचा पक्ष, शिंदेंचा पक्ष आणि दादांनी प्रचारात आघाडी घेतली, लाडकी बहिण योजना कोणाची? यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आहे. मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात. आम्ही त्या सरकारचे घटक आहोत. आमच्या सगळ्यांची बहिण आहे. मोठा भाऊ कोण? लहान भाऊ कोण? यांच्याशी बहिणीला देणघेणं नाही. भावांनी आपल्याला लक्षात ठेवलं याचा बहिणींना आनंद आहे. राखी, भाऊबीज असेल, ओवाळणी स्वरुपात दिलं. भावांनी लक्षात ठेवंल यावर बहिणी खुश आहेत. कोण मोठं, कोण लहान याच्याशी देणघेण नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.