Rajya Sabha Election: प्रत्येक आमदारांची नोंदणी, मार्गदर्शन की संख्याबळाची चाचपणी?; आघाडीच्या बैठकीचा अर्थ काय?
Rajya Sabha Election: आघाडीची बैठक हॉटेल ट्रायडन्टमध्ये होत आहे. शिवसेनेने आघाडीच्या आमदारांना रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण या सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडन्टमध्ये आणण्यात आलं आहे.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीचं (Rajya Sabha Election) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. भाजपने (bjp) या निवडणुकीत सातवा उमेदवार उतरवल्याने या निवडणुकीची चुरस अधिकच वाढली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने (mahavikas aghadi) ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली असून गंभीरपणे घेतली आहे. काही छोट्या पक्षांनी सहकार्य न करण्याची भूमिका घेतल्याने आघाडीने आज तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आघाडीच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यानंतर हे आमदार हॉटेल ट्रायडन्टमध्ये पोहोचले आहेत. आमदारांना राज्यसभा निवडणुकीची तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक बोलावल्याचं आघाडीकडून सांगितलं जात आहे. पण येणाऱ्या प्रत्येक आमदारांच्या नावाची नोंदणी करण्यात येत असून त्यांची सहीही घेतली जात आहे. त्यामुळे ही बैठक मार्गदर्शनासाठी आहे की आमदारांचं संख्याबळ तपासण्यासाठी ही बैठक आयोजित केलीय अशी चर्चा सध्या रंगली आहे.
भाजपने अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व अपक्ष आमदार आघाडीतील कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे आघाडीचे नेते अॅलर्ट झाले आहेत. त्यातच काही छोट्या पक्षांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. सहावा उमेदवार निवडून येण्यासाठीच्या आकड्यांची जुळवाजुळव करण्यासाठी आघाडीने प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होत आहे.
नोंदणी करूनच प्रवेश
ट्रायडन्ट हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. या बैठकीला आमदार पोहोचले आहेत. संपूर्ण सभागृह भरलं आहे. पण प्रत्येक आमदारांची नोंदणी करूनच त्यांना प्रवेश दिला गेला आहे. एकूण किती आमदार उपस्थित होते आणि कोणत्या पक्षाचे आमदार उपस्थित होते, याची चाचपणी करण्यासाठी ही नोंदणी करण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून सर्वच पक्षाचे किती आमदार उपस्थित होते याचा अंदाज येणार आहे. तसेच किती अपक्ष आमदार उपस्थित होते याचाही अंदाज येणार आहे. शिवाय किती छोट्या पक्षांचे आमदार या बैठकीला हजर होते याचाही अंदाज काढता येणार आहे.
ट्रायडन्टच का?
आघाडीची बैठक हॉटेल ट्रायडन्टमध्ये होत आहे. शिवसेनेने आघाडीच्या आमदारांना रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण या सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडन्टमध्ये आणण्यात आलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार बनताना आघाडीची बैठक ट्रायडन्टमध्येच झाली होती. इथेच आघाडीवर शिक्कामोर्तब झालं होतं आणि सरकारही स्थापन झालं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा याच हॉटेलची निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.