Ajit Pawar : मंत्रिमंडळ विस्तारात अजितदादा धक्का देणार का? कोणाचा पत्ता कट होऊन कोणाला संधी मिळणार?
Ajit Pawar : जनतेने स्पष्ट कौल देऊनही आधी सरकार स्थापनेला विलंब झाला. त्यानंतर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. आता अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता सूत्रांकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेबद्दल माहिती मिळालीय. त्यानंतर आता अजितदादा मंत्रिपदाची संधी देताना धक्कातंत्राचा वापर करु शकतात अशी चर्चा आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 5 डिसेंबरला शपथविधी झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज शपथविधीला एक आठवडा होतोय, पण अजून खातेवाटप जाहीर झालेलं नाही. नवीन सरकार अस्तित्वात येऊनही खाते वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. गृहमंत्रीपद तसचं अन्य महत्त्वाच्या खात्यावरुन हा पेच फसल्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार निवडून आले आहेत. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादीकडून चांगल्या खात्याची मागणी होणं, त्यांनी तशी अपेक्षा करणं स्वाभाविक आहे.
आता काल रात्री दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. जवळपास दोन तास चाललेल्या या बैठकीत कुठल्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार? कोणला कोणती खाती मिळणार? या संदर्भात विस्तृत चर्चा झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्याआधी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी सूत्रांची माहिती आहे. भाजपला सर्वाधिक 22, शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदं मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदची लॉटरी कोणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदं देताना धक्कातंत्राचा वापर केला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. दीर्घकाळ मंत्रिपद भुषवण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे. त्यासाठी चाचपणी सुरु आहे. अजित पवारांनी स्वबळावर पक्षाचे 41 आमदार निवडून आणले आहेत. अनुभवी, ज्येष्ठ नेत्यांऐवजी युवा नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी मिळू शकते अशी चर्चा आहे.