Nawab Malik : ‘महिला तक्रार घेऊन गेल्या की, त्यांचे कपडे फाडतात’, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
Nawab Malik : "शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये ड्रग्जच साम्राज्य आहे. ही गुंडगिरी, झुंडशाही संपवण्यासाठी ड्रग्जमुक्त शिवाजीनगर निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. आव्हान स्वीकारुन मी निवडणूक लढतोय आणि जिंकणार" असं नवाब मलिक म्हणाले.
“मी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. महायुतीचा वेगळा उमेदवार आहे. ते माझा विरोध करतायत. मी एनसीपीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवतोय आणि जिंकणार” असं नवाब मलिक म्हणाले. महायुतीमध्ये नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरुन मतभेद आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवाब मलिक यांना शिवाजीनगर-मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. त्याला भाजपा, शिवसेनेचा विरोध आहे. आज टीव्ही 9 मराठीने नवाब मलिक यांच्याशी संवाद साधला.
शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघात तुमच्यासमोर समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांचं आव्हान आहे. “निवडणूक हे आव्हान असते. इथे निवडणूक लढण्याचा निर्णय मी लोकांच्या आग्रहामुळे घेतला आहे. शिवाजीनगर-मानखुर्दमध्ये आजघडीला गुंडगिरी, झुंडशाही सुरु आहे” असा आरोप नवाब मलिक यांनी केला.
‘आव्हान स्वीकारुन मी निवडणूक लढतोय’
“महिला तक्रार घेऊन गेल्या की, त्यांचे कपडे फाडतात. यांचे लोकांना लाठ्या-काठ्या घेऊन धमकावतात. तिथे ड्रग्जच साम्राज्य आहे. ही गुंडगिरी, झुंडशाही संपवण्यासाठी ड्रग्जमुक्त शिवाजीनगर निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे. आव्हान स्वीकारुन मी निवडणूक लढतोय आणि जिंकणार” असं नवाब मलिक म्हणाले.
‘समाजवादी पार्टीच कार्यालय म्हणजे ड्रग्जचा अड्डा’
सपाच्या कार्यालयातून ड्रग्ज सेवनाचे व्हिडिओ व्हायरल झालेत, त्या प्रश्नावर नवाब मलिक म्हणाले की, “मी लोकांना आव्हान करतो की, त्यांनी स्वत:च्या मुलांना संभाळा. त्यांना सपापासून लांब ठेवा. त्यांच्या कार्यालयात ड्रग्जचे अड्डे निर्माण झालेत. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सर्तक करणार आहे”
“अल्पसंख्यांक खात्याचा मंत्री म्हणून मी कधीही न झालेली काम केली. मंत्री म्हणून मी जी कामं केली, त्यावर निर्णय झाला. अल्पसंख्यांक समाजाला फायदा मिळणार आहे” असं नवाब मलिक म्हणाले.