एका कचक्यात मोठा गेम होणार?, मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेडमध्ये काय ठरलं?; अंतरवली सराटीत काय घडतंय?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी अनेक राजकीय नेते आतुर झाले आहेत. संभाजी ब्रिगेडनेही जरांगे यांची भेट घेतली असून, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित भूमिका घेण्याची शक्यता आहे. संभाजी ब्रिगेड स्वतंत्रपणे निवडणूक लढेल. परंतु योग्य उमेदवार निवडण्यासाठी जरांगे पाटील यांच्याशी समन्वय साधला जाईल, असं माजी मंत्री बदामराव पंडित यांनी सांगितलं.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा झाल्यापासून अंतरवली सराटीला अधिक महत्त्व आलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे इच्छुक उमेदवार, माजी आमदार आणि विद्यमान आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. कोणी मध्यरात्री गुपचूप भेटायला येत आहे, तर कोणी पहाटे पहाटे भेटायला येत आहे. प्रत्येकजण आपली बाजू कशी भक्कम आहे, आपण कसे योग्य उमेदवार आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनीही जरांगे यांची भेट घेतली. या बैठकीत नेमकं काय घडलं? दोघे मिळून एकत्र निवडणूक लढणार की अंडरस्टँडिंग ठेवून उमेदवार देणार? याबाबतची माहिती माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दिली आहे.
बदामराव पंडित यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. संभाजी ब्रिगेड हे एक संघटन आणि राजकीय पक्ष आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश व्हावा तसेच ओबीसींचे संरक्षण व्हावे हे मुद्दे घेऊन संभाजी ब्रिगेड गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे. तीच भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे, अशी माहिती बदामराव पंडित यांनी दिली आहे.
आपला झेंडा, आपला अजेंडा हवा
विधानसभेत आपली माणसं पाठवायची असेल आणि आपले प्रश्न मार्गी लावायचे असेल तर समविचारी लोकांशी चर्चा करून राजकीय भूमिका घेतली पाहिजे. आपला झेंडा, आपला अजेंडा ही भूमिका पाहिजे. याबाबत पुढे निर्णय होईल आणि त्या अनुषंगाने पुढे वाटचाल चालू होईल, अशी माहितीही बदामराव पंडित यांनी सांगितलं.
समन्वय चांगला
जरांगे पाटील आणि आमचा समन्वय चांगला आहे. मात्र या लोकशाहीच्या महोत्सवात आम्ही स्वतंत्र सामील होणार आहोत, असं संभाजी ब्रिगेडने आधीच जाहीर केलं आहे. मनोज जरांगे यांनीही तसंच जाहीर केलं आहे. पण उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही. जी भूमिका जरांगे पाटलांची आहे, तीच भूमिका आमची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ठरवून उमेदवार देऊ
विधानसभेत समाजाचे प्रश्न मांडणारे लोक गेले पाहिजे. योग्य उमेदवार देण्याबाबत आम्ही सविस्तर करणार आहोत. जरांगे पाटील यांच्याकडेही आणि आमच्याकडेही उमेदवार येतात. परंतु आम्ही ठरवून उमेदवार देणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.