मनोज जरांगे पाटील यांचा फटका बसणार?, कुणाचा गेम?; चर्चा काय?
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी लागणार आहे. त्यामुळे देशात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. देशात भाजपची सत्ता येणार की नाही हे देशातील पाच राज्य ठरवणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्र हे चार राज्य भाजपची केंद्रात सत्ता येणार की नाही हे ठरवणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास अजून चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे आता थोड्याच वेळात एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्यातून राज्याचा आणि देशाचा कल काय आहे याचा अंदाज येणार आहे. मात्र, सर्वच विश्लेषकांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच वरचढ असल्याचं सांगितलं आहे. महायुतीला या निवडणुकीत फटका बसणार आहे. यावेळी महायुतीला 42 जागा राखता येणार नाही. त्यांना किमान 15-16 जागांचं नुकसान होऊ शकतं, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. या निवडणुकीत वंचित आघाडीचा फॅक्टर चालणार नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चालणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचा फटका महायुतीलाच बसणार असल्याचंही बोललं जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं. जरांगे यांचं हे आंदोलन सरकारला व्यवस्थित हाताळता आलं नाही. सरकारने वारंवार आश्वासने दिली. पण प्रत्यक्षात काहीच केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झाली होती. मनोज जरांगे यांनी कुणाला मतदान करा हे सांगितलं नाही. फक्त त्यांनी मराठा विरोधी लोकांना पाडा असं आवाहन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाचा सर्व रोख भाजपविरोधी होता. त्यामुळे भाजपला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.
महायुतीतील नेत्यांशी जुंपली
मनोज जरांगे पाटील यांचं संपूर्ण आंदोलन काळात केवळ महायुतीतील नेत्यांशीच वाजलं होतं. जरांगे यांनी सातत्याने दोन नेत्यांवर टीका केली. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ. या दोन्ही नेत्यांवर जरांगे यांनी नुसती टीका केली नाही तर त्यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. त्यानंतर शेवटी शेवटी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांनीही फसवणूक केल्याचं म्हटलं होतं. तर आपल्या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी वारंवार यावं लागल्याचा दावाही जरांगे यांनी केला होता. यातून जरांगे यांनी सरकार आपल्या विरोधात असल्याचा संदेश समाजात दिला होता.
जरांगे यांना मराठवाडा आणि विदर्भातून मोठा पाठिंबा मिळाला होता. पश्चिम महाराष्ट्रातही त्यांच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे मराठवाड्यात महायुतीला जरांगे फॅक्टरचा सर्वाधिक फटका बसू शकतो, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसू शकतो तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो, असंही सांगितलं जात आहे.
आकडेवारीच बोलणार
दरम्यान, एक्झिट पोलचे आकडे आज येणार आहेत. तर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 4 जून रोजीच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा महाराष्ट्रात किती परिणाम झाला आणि या आंदोलनाचा कुणाला फटका बसला हे चित्र स्पष्ट होणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा या निवडणुकीत परिणाम झाला तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राजकारण्यांची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे.