Maratha reservation | काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु! अशोक चव्हाणांचा कुणावर निशाणा?
काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड असल्याचा आरोप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. त्यावरुन आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी बोलणारी लोकं आहेत. निर्णय घेतला तर त्याला विरोध करायचा, अशी भूमिका घेतली जात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. (Ashok Chavan criticize Sambhaji Raje and Vinayak Mete)
“मराठा समाजाला EWSच्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. तेव्हा संभाजीराजे, विनायक मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय स्थगित ठेवला. मात्र, SEBCच्या उमेदवारांना EWSचा लाभ मिळावा म्हणून काहीजण कोर्टात गेले. उच्च न्यायालयाने 12 ते 13 प्रकरणात EWSचं आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. EWS आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून कसं रोखू शकतो?”असा प्रश्न विचारत त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
‘मराठा आरक्षण टिकावं हीच सरकारची भूमिका’
25 तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. त्यावर मराठा आरक्षण टिकले पाहिजे अशीच सरकारची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी पुढील सुनावणीच्या दृष्टीनं राज्य सरकारची तयारी सुरु असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
खासदार संभाजीराजे आक्रमक
“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.
..मग ‘सारथी’ बंद करा- संभाजीराजे
शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार जपायचा असेल तर सारथी संस्थेच्या मुद्द्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लक्ष घातलं पाहिजे. सारथीच्या स्वायत्ततेचा मुद्दा वर्षभरापासून सुरु आहे. जर याबाबत निर्णय घेता येत नसेल, तर शाहू महाराजांच्या विचार मानणाऱ्यांनी ही संस्था बंद करावी. आपल्याला शाहू महाजारांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.
संबंधित बातम्या:
राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे
शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे
Ashok Chavan criticize Sambhaji Raje and Vinayak Mete