मराठा आरक्षणासाठी भाजपने पायात पाय नाही तर हातात हात घालून पुढे जावं, अशोक चव्हाणांचं आवाहन
संभाजीराजे यांची भूमिका चुकीची नसल्याचं सांगत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय. संभाजीराजे यांनी शुक्रवारी सरकारला मराठा समाजाबाबत 5 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींवर सरकारने काम केलं नाही तर शिवराज्याभिषेकानंतर 7 जूनला रायगडावरुन आंदोलनाचा इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे. तसंच संभाजीराजे यांनी सरकारला 3 कायदेशीर पर्यायही सुचवले आहेत. याबाबत बोलताना संभाजीराजे यांची भूमिका चुकीची नसल्याचं सांगत मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केलीय. (Ashok Chavan’s support to Sambhaji Raje’s stand on Maratha reservation)
मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर भाजपनं पायात पाय घालण्यापेक्षा हातात हात घालून पुढे जावं. संभाजीराजे यांनी चुकीची भूमिका घेतलेली नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला हीच त्यांची भूमिका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ न देणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका चव्हाण यांनी केलीय. त्याचबरोबर केंद्र सरकारने याबाबत संसदेचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी करतानाच भाजपनं या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नये, असं आवाहनही अशोक चव्हाण यांनी भाजप नेत्यांना केलंय.
संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या 5 गोष्टी सांगितल्या?
1. मराठा तरुणांच्या नियुक्त्या : 9 सप्टेंबर 2020 पर्यंत नियुक्त्या झाल्यात त्यांना रुजू करुन घ्या हे सांगितलं, मग राज्य सरकार थांबलंय का? लोकांच्या भावनांशी का खेळताय? गरिब मराठ्यांना न्याय द्या.
2. सारथी संस्था : शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी केली, मात्र त्याची अवस्था काय आहे? सारथीला स्वायत्तता दिली तर आरक्षणापेक्षाही उत्तम ठरेल. माझं हे मोठं वक्तव्य आहे. सारथीला चालना मिळाली तर समाज बदलेल. सारथीचं अध्यक्षपद मला अजिबात नको. सारथीला 1 हजार कोटी द्या. कोव्हिड काळात पैसा नाही म्हणता, पण आम्ही प्लॅन करु. आता 50 कोटी दिले तर त्यामध्ये आम्ही काय प्लॅन करु? पैसे द्यायचे नसतील तर ती सारथी संस्था बंद करा. शाहू महाराजांच्या नावे अशी संस्था नको.
3. अण्णासाहेब महामंडळ : या महामंडळातून गरीब मराठ्यांना उद्योग उभं करुन देऊ शकता. दहा लाखाचं लिमिट आहे. मात्र ही मर्यादा 25 लाख करा. कर्ज काढायला गेल्यावर जमीन मॉर्गेज मागतात, मात्र जमिनीच नाहीत तर देणार काय?
4. वसतीगृह : प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभा करा. ते तुमच्या हातात आहे, ते करा.
5. ओबीसींच्या सवलती द्या : 70 टक्के गरीब मराठा समाज आहे. मी शाहूंचा वंशज आहे. गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही. ज्या सवलती शिक्षणामध्ये ओबीसींना मिळतात, त्या गरीब मराठ्यांनाही द्या.
संबंधित बातम्या :
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंचे 3 कायदेशीर पर्याय! जबाबदारी कुणाची? वाचा सविस्तर
“…तर सारथी संस्था मराठा आरक्षणालाही भारी पडेल”, संभाजीराजेंचं मोठं विधान
Ashok Chavan’s support to Sambhaji Raje’s stand on Maratha reservation