Maratha Reservation : संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फडणवीसांचं महत्वाचं आवाहन
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. संभाजीराजे यांच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन संभाजीराजेंचं उपोषण सोडवावं, असं आवाहनही फडणवीस यांनी केलंय.
मुंबई : मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaje Chatrapati) यांनी शनिवारपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केलीय. संभाजीराजे यांच्यासह आझाद मैदानात शेकडो कार्यकर्त्यांनीही उपोषणाला बसले आहेत. इतकंच नाही तर राज्यभरातही विविध संघटना या उपोषणात सहभागी झाल्या आहेत. अशावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केलीय. संभाजीराजे यांच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ हस्तक्षेप करुन संभाजीराजेंचं उपोषण सोडवावं, असं आवाहनही फडणवीस यांनी केलंय.
“केवळ आणि केवळ नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालविणार्या महाविकास आघाडी सरकारने विविध मागण्यांबाबत आतातरी गंभीर व्हावे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना अखेर उपोषणाचा मार्ग पत्करावा लागला. त्यांच्या मागण्यांना आमचे पूर्ण समर्थन आहे आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे!”, असं ट्वीट करत फडणवीसांनी संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा जाहीर केलाय.
महाविकास आघाडी सरकारने मराठा बांधवांच्या संयमाचा अंत पाहू नये. केवळ वेळकाढू धोरण अवलंबू नये. भारतीय जनता पार्टी या लढ्यात मराठा बांधवांसोबत आहे. मुख्यमंत्र्यांनी @CMOMaharashtra तत्काळ हस्तक्षेप करून युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण सोडवावे ! @YuvrajSambhaji
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2022
सरकारनं शब्द पाळला नाही म्हणून उपोषण- संभाजीराजे
दरम्यान, ‘मराठा आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी वेळही लागू शकतो. पण आम्ही सात मागण्या केल्या होत्या. त्यापैकी एकही मागणी पूर्ण झाली नाही. 15 दिवसात या मागण्या मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळे उपोषणाशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय राहिला नाही. म्हणूनच मी आजपासून उपोषणाला बसलो आहे’, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.
संभाजीराजेंचं आमरण उपोषण कशासाठी?
1. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी अपेक्षित न्या. दिलीप भोसले यांच्या समितीने सांगितलेले 12 मुद्दे आणि मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक निर्णय शाससाने गांभिर्याने घेऊन पुढील कारवाई सुरु करावी.
2. मराठा आरक्षण मिळणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. मात्र, तोपर्यंतच्या काळात समाजाचे शैक्षणिक व सामाजिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी माझा हा लढा आहे.
3. ESBC आणि SEBC आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या पण अद्याप नियुक्ती न झालेल्या उमेदवारांना त्यांची ज्या पदावर निवड झालेली आहे, त्याच पदावर कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी.
4. सारथी संस्थेच्या सबलीकरणासाठी रोड मॅप तयार करुन सारखी संस्थेचे सक्षमीकरण करावे. येणाऱ्या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात यासाठी भरीव निधीची तरतूद करावी.
5. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत देण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा वाढवावी भरिव आर्थिक निधीची तरतुद करुन महामंडळाकडे पैसे वर्ग करावेत. सध्या या महामंडळाला पूर्णवेळ कार्यकारी संचालक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारे संचालक मंडळ नेमणे आवश्यक आहे.
6. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह तात्काळ सुरु करावे.
7. कोपर्डी खून खटल्याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी शासनाने पाठपुरावा करुन आरोपींना फाशी होण्यासाठी आग्रही रहावे.
8. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनातून ज्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचा आश्वासनाची पूर्तता करावी.
9. आंदोलन करणाऱ्या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने काढलेल्या नव्या शासन निर्णयात झालेल्या मालमत्तेचे नुकसान भरपाईबाबत उल्लेख आहे. त्यावर सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे ते गुन्हे मागे घ्यावेत. आता नव्याने मुंबई पोलिसांनी 2017 मध्ये निघालेल्या बाईक रॅलीत सहभागी सर्वांवर नोटीसा काढलेल्या आहेत. ते देखील रद्द करावेत.
इतर बातम्या :