अजित पवार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्यास शिवसेनेची भूमिका काय? आदित्य ठाकरे यांनी एका वाक्यात उत्तर दिलं
Aditya Thackeray on Ajit Pawar : अजित पवार, राज्याचं मुख्यमंत्रिपद अन् महाविकास आघाडीची भूमिका; आदित्य ठाकरे यांची सविस्तर प्रतिक्रिया
माथेरान : माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचं आज उद्घाटन झालं. तिथं बोलताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अजित पवार, राज्याचं मुख्यमंत्रिपद अन् महाविकास आघाडीची भूमिका यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय. अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील तर शिवसेनेची काय भूमिका असेल? या प्रश्नाचं त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री कोण होणार, याची सध्या महाविकास आघाडीत कोणतीही चर्चा नाही, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
सरकारवर टीकास्त्र
सध्या महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपलं राज्य अंधारात गेलं आहे. खूप सारे उद्योजक आपल्या राज्यात यायला तयार नाहीत. गुंतवणूक होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ती होत होती. पर्यटन असेल, पर्यावरण असेल. महाविकास आघाडीच्या काळात शाश्वत विकास होत होता. तसा आता होत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केलीये.
मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. कारण हे घटनाबाह्य सरकार आहे. लोकशाहीच्या विरुद्ध सरकार आहे आणि गद्दारांचं सरकार आहे. बेईमानांचा सरकार कधीही टिकत नाही, महाराष्ट्रात बेईमानी टिकत नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलंय.
आता जरी आपण पाहिले तरी पुण्यातील अनेक प्रश्न असतील, वारेगाव, नांदगाव रामटेक, आरे जिथे जिथे नागरिक पुढे येऊन त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतात. तिथे सरकार त्यांच्यावर लाठीचार्ज करतं आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांवरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत. तिथे-तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे माथेरान दौऱ्यावर
आदित्य ठाकरे हे आज माथेरान दौऱ्यावर होते. माथेरानमध्ये माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचं त्यांनी उद्घाटन केलं. तसंच माथेरानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी बक्षीस वितरण केलं. माथेरानमधील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे माथेरानच्या फुलराणीने म्हणजेच मिनी ट्रेनने प्रवास करत माथेरानमध्ये दाखल झाले. माथेरानमधील कार्यक्रम संपवून आदित्य ठाकरे नंतर पुण्याकडे रवाना झाले.