मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय गटनेत्यांसोबत बैठक
पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते असल्याने, त्यात विरोधी पक्षांचे गटनेतेही आहेत. त्यामुळे त्यांची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात या बैठकीआधी विरोधी पक्षांची सुद्धा एक बैठक होणार असून, […]
पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षणावर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत सर्वपक्षीय गटनेते असल्याने, त्यात विरोधी पक्षांचे गटनेतेही आहेत. त्यामुळे त्यांची काय भूमिका असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यात या बैठकीआधी विरोधी पक्षांची सुद्धा एक बैठक होणार असून, त्यातही मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे.
5 नव्हे, 1 डिसेंबरलाच मराठा आरक्षण
अनेक वर्षांचा संघर्ष संपण्याची तारीख अखेर जवळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 1 डिसेंबरपासून मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता आहे. 29 तारखेला विधानसभेत आणि 30 तारखेला विधानपरिषदेत मराठा आरक्षणाचं विधेयक आणलं जाणार आहे. त्याच दिवशी राज्यपालांची सही घेऊन या विधेयकाचं कायद्यात रुपांतर केलं जाणार आहे. म्हणजेच मराठा समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष थांबून 1 डिसेंबरपासून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
मुंबईत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक नुकतीच संपली. बिनचूक कायदा केला जावा आणि आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा ही भूमिका समितीने घेतली आहे. एटीआर आणायचा की पूर्ण अहवाल आणायचा याबाबत निर्णय उद्या गटनेत्याच्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं मंत्रीमंडळ समितीने सांगितलं.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. 2014 ला मिळालेलं आरक्षण केवळ क्षणिक सुख देणारं ठरलं. पण वैधानिक प्रक्रिया पूर्ण करत यावेळी सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळात आरक्षणाचं विधेयक ठेवून ते मंजूर केलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे.
आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला थेट जल्लोष करा, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिला होता. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 नोव्हेंबरपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे 20 नोव्हेंबरपासूनच विरोधकांनी मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणावरुन सरकारला धारेवर धरलं आहे. मागासवर्ग आयोगाने दिलेला मराठा आरक्षणावरील अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडण्याची मागणी सुद्धा विरोधकांकडून केली जात आहे. विशेषत: विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर मराठा आरक्षणाचा अहवाल पटलावर मांडण्याची जोरदार मागणी सभागृहात केली.
राज्य सरकारकडून मात्र सातत्याने मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल, असे आरक्षण दिले जाईल, तसेच मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत, एवढेच सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा अहवाल मात्र राज्य सरकारकडून सभागृहात मांडण्यात येत नाही. त्यावरुन अधिवेशन सुरु झाल्यापासून सभागृहात विरोधकांनी जोरदार मागणी करत, सरकारला जेरीस आणलं आहे.
मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये कोण-कोण?
मराठा आरक्षणाबाबत वैधानिक कार्यवाही करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्याबाबतचा जीआर नुकताच जारी करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष आहेत. तर शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक उपक्रम बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जलसंधारण मंत्री राम शिंदे, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा हे या उपसमितीचे सदस्य आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सह सदस्य आहेत.
कॅबिनेटने मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशी 18 नोव्हेंबरला स्वीकारल्या. त्यानंतर मंत्रीमंडळ उपसमितीची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली होती. आरक्षणाबाबतची वैधानिक कार्यवाही करण्याचा अधिकार मंत्रीमंडळ समितीला देण्यात आला आहे आणि याच समितीचा निर्णय अंतिम असेल. विचारविनिमयासाठी गरजेनुसार तज्ञ, विधिज्ञ आणि संबंधित अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्याचे अधिकार या उपसमितीला देण्यात आले आहेत.