Milind Deora: काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिवसेनेकडून राज्यसभा मिळवण्यासाठी इच्छुक होते; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
Milind Deora : मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दिलखुलास चौकशी केली पाहिजे. नक्कीच चौकशी होऊद्या. चांगली कामं आम्ही केलीत. ती जनतेसमोर येतील, असं टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.
मुंबई: काँग्रेसचे नेते, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) शिवसेनेवर (shivsena) टीका करत असले तरी मिलिंद देवरा हे शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होते. शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून मिलिंद देवरा प्रयत्न करत होते. पण शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेवर टीका करण्यास सुरुवात केल्याचा दावा शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला आहे. शिवसेना नेत्याच्या या खासगीतील दाव्याबाबत शिवसेना नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aadity thackeray) यांनीही संकेत दिले आहेत. मात्र, मैत्रीपोटी आदित्य ठाकरे यांनी देवरा यांच्यावर आरोप करणे आणि त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं. दरम्यान, मिलिंद देवरांबाबतचा हा नवा खुलासा उघड झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मिलिंद देवरा यांनी या पूर्वी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड रचनेवरून शिवसेनेवर टीका केली होती. कुणाच्या तरी हितासाठी ही वॉर्ड रचना करण्यात आल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेचं नाव न घेता केली होती. या संदर्भात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वॉर्ड रचनेत लक्ष घालण्याची विनंतीही केली होती. देवरा यांच्या या टीकेमुळे शिवसेना नेत्याने मिलिंद देवरांबाबतचा हा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
आदित्य ठाकरेंचं सूचक विधान
आदित्य ठाकरे यांनीही याबाबत सूचक संकेत दिले आहेत. ते दोस्त आहेत. त्यांना दोस्ती अधिक वाढवायची होती. पण त्यांच्या मनात जे होते. ते आम्ही पूर्ण करू शकलो नाही. त्यांच्या काही इलेक्शन संदर्भातील अपेक्षा असतील. पण त्याबाबत मी अधिक बोलणार नाही, असं सूचक विधान आदित्य ठाकरे यांनी केलं. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मिलिंद देवरा यांच्यावर कोणतीही थेट केली नाही. उलट या विषयावर आपण अधिक भाष्य करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
दिलखुलास चौकशी करा
मुंबई महापालिकेच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दिलखुलास चौकशी केली पाहिजे. नक्कीच चौकशी होऊद्या. चांगली कामं आम्ही केलीत. ती जनतेसमोर येतील, असं टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. 40 गद्दार निवडणुका घ्यायला का घाबरत आहेत? जेव्हा घटनाबाह्य सरकार स्थापन झालं तेव्हा दोघांचा शपथविधी झाला. काल मंत्र्यांचे बंगले ठरलेत पण पालकमंत्री ठरलेले नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.
ते गद्दारच
हे सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही. हाच मूळ मुद्दा आहे. जे काही सकाळी घडलं. ते एवढं झोमण्याचं कारण नाही. धक्काबुक्की झाली ते योग्य नाही. तिकडचे 2-3 आमदार गुंडागिरीची भाषा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला काल सभागृहात धमकी दिली. आज पायऱ्यांवर जे लोकं होते त्यांना काही मिळालं नाही ते त्यांचं दु:ख असेल. त्यांना योग्य शब्द आहे तो म्हणजे गद्दारच, अशी टीकाही त्यांनी केली.