लोकसभा निवडणुकीतील जायंट किलर, पत्रकार ते खासदार, कोण आहेत इम्तियाज जलील?
MP Imtiaz Jaleel | इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मित्रमंडळींसाठी धक्कादायक होता. यावेळी कोणत्या पक्षात जायचे हा पेच त्यांच्यासमोर होता.
मुंबई: शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये चंद्रकांत खैरे यांना आस्मान दाखवत एमआयएम पक्षाचे इम्तियाज जलील हे जायंट किलर ठरले होते. औरंगाबादमधील हा पराभव शिवसेनेच्या विशेषत: चंद्रकांत खैर यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. तेव्हापासून एक खासदार म्हणून इम्तियाज जलील हे सातत्याने चर्चेत असतात. तब्बल 23 वर्षे पत्रकारिता केल्यानंतर राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांचा आजवरचा प्रवास रंजक असा आहे.
कोण आहेत इम्तियाज जलील?
इम्तियाज जलील यांचा जन्म 10 ऑगस्ट 1968 रोजी झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. तर भाऊ जेट एअरवेजमध्ये व्यवस्थापक आहे. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या जलील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकमत टाइम्समधून पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली.
नंतरच्या काळात इम्तियाज जलील यांची एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे पुण्यातील ब्युरो चीफ म्हणून निवड झाली. औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये त्यांनी तब्बल 23 वर्षे पत्रकारिता केली. त्यामुळे इम्तियाज जलील यांना महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणाची चांगली जाण आहे.
पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश
इम्तियाज जलील यांनी 2014 साली पत्रकारिता सोडून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय मित्रमंडळींसाठी धक्कादायक होता. यावेळी कोणत्या पक्षात जायचे हा पेच त्यांच्यासमोर होता. काहीजणांनी इम्तियाज जलील यांना ‘आम आदमी पक्षात’ जाण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्रकारिता करत असतान इम्तियाज जलील एमआयएम पक्षाचे तेलंगणा आणि हैदराबादमधील काम पाहून प्रभावित झाले होते. तसेच प्रस्थापित पक्ष औरंगाबादमध्ये मुस्लिम नेतृत्त्वाला संधी देण्याच्या मताचे नव्हते. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला. एमआयएमचे संस्थापक असदुद्दीने औवेसी आणि इम्तियाज जलील यांचे कौटुंबिक संबंधही आहेत.
इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रवास
एमआयएम पक्षात प्रवेश केल्यानंतर इम्तियाज जलील यांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. एमआयएमने त्यांना औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उमेदवारी दिली. शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इम्तियाज जलील यांना प्रचारासाठी फार थोडे दिवस मिळाले. मात्र, तरीही इम्तियाज जलील यांनी या विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणला. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव केला.
आमदारकीची टर्म संपत नाही तोच इम्तियाज जलील यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी चालून आली. मात्र, त्यांच्यासमोर शिवसेनेचे मातब्बर नेते चंद्रकांत खैरे यांचे आव्हान होते. या निवडणुकीत एमआयएम हा पक्ष वंचित बहुजन आघाडीत सामील झाला होता. त्यामुळे इम्तियाज जलील यांनी चमत्कार करुन दाखवला. पहिल्याच प्रयत्नात इम्तियाज जलील यांनी सलग चार टर्म खासदार असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला. या विजयामुळे इम्तियाज जलील हे जायंट किलर ठरले होते.
संबंधित बातम्या
माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा