केसरकर 2 दिवसांत जाहीर करणार कोणी घेतले 50 खोके
आता 2 दिवसांत खोके कोणी घेतले, हे जाहीर करणार असा इशारा केसरकरांनी दिला आहे.
मुंबई : खोके कोणी घेतले, याचा पर्दाफाशच करण्याचा इशारा, मंत्री दीपक केसरकरांनी दिला आहे. शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं, तेव्हापासूनच 50 खोक्यांवरुन डिवचणं सुरु आहे. अंधेरीतही शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना पाहून, 50 खोके, एकदम ओक्केच्या घोषणा देण्यात आल्या. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लांडेही उपस्थित होते. त्यावेळी ठाकरे गटाकडून घोषणा देण्यात आल्या. त्यामुळं आता 2 दिवसांत खोके कोणी घेतले, हे जाहीर करणार असा इशारा केसरकरांनी दिला आहे.
50 खोके, एकदम ओक्केच्या घोषणा आता गावा-गावापासून ते विधानसभेच्या पायऱ्यांपर्यंत आल्या आहेत. अधिवेशनातही शिंदे गटाच्या आमदारांना पाहून, खोक्यांवरुन घोषणाबाजी झाली.
खोक्यांवरुन झालेल्या टीकेवरुन आतापर्यंत ठाकरे गट आणि शिंदे गटात, जोरदार जुंपलेली आहे…मुख्यमंत्री शिंदेंनी तर, याआधीच खोके कुठं गेले, याचा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय.
आता केसरकरांनी, खोक्यांचा हिशोब देणार असल्याचंच म्हटलंय. त्यामुळं नेमके खोके कोणते, कुठं गेले आणि कोणी घेतले ? हे त्यांच्या म्हणण्याप्रमाणं 2 दिवसांत कळेलच.