Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच भाजपाच्या ‘या’ नेत्याने जोडले हात
Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. वटसावित्रीच्या पूजेवरुन संभाजी भिडे यांनी वक्तव्य केलं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्या संदर्भात प्रश्न विचारताच एका भाजपा नेत्याने हात जोडून प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.
सध्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा आहे. वटसावित्रीच्या पूजेवरुन संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं” असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. त्यावरुन आता वाद निर्माण झालाय. पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना आधीच नोटीस पाठवली होती. आज पालखीला मानवंदना करताना कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही, याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे आज करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्या होत्या.
आजा पत्रकारांनी राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांना संभाजी भिडे यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली. त्यावर गिरीश महाजन यांनी हात जोडले. प्रश्न विचारताच हात जोडत, चला म्हणत गिरीश महाजन यांनी उत्तर देणं टाळलं. काल लोणावळा भुशी डॅम परिसरात दुर्देवी घटना घडली. एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले. त्या संदर्भात गिरीश महाजन म्हणाले की, “मी आज घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार आहे. आमची टीम काम करत आहे. पाण्यात जाण्याचा मोह पावसाळ्यात आवरत नाही, मात्र आपण काळजी घेतली पाहिजे”
‘आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री तोडगा काढतील’
पीक विमा संदर्भातही ते बोलले. नाकापेक्षा मोती जड नको म्हणून आपण पीक विमा 1 रुपयात दिला आहे. ‘जर कुठे 100 रुपये घेवून काही लोक गडबड करत असतील तर कारवाई होईल’ असं ते म्हणाले. आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्री तोडगा काढतील असं ते म्हणाले.