मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणताही वाद नाही, पक्ष एकसंघ आहे. राज्यातील अनेक नेते आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पक्षात परत यायचं आहे. विशेषत: जे भाजपात गेलेत ते संपर्क करत आहेत. भाजपात गेल्यानंतर ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला ते आमच्याशी संपर्क करत आहेत. त्यांच्याशी आमची चर्चा सुरु आहे. त्यांना पक्षात घेण्यात अडचण नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर विविध चर्चांना उधाण आलं आहे. आजोबांनी फटकारल्यामुळे नातू पार्थ नाराज आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, “पार्थ पवार आणि त्यांचे वडील अजित पवार नाराज नाहीत”, असं पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे (Minister Jayant Patil ).
पार्थ पवारांच्या नाराजीबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, पार्थ नाराज आहेत हे कुणी सांगितलं? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. “शरद पवार हे आजोबा आहेत. आजोबांना बोलण्याचे अधिकार आहेत. कुटुंबातील कुणी वरिष्ठ, वडिलधारी व्यक्ती बोललं तर आपण नाराज होतो का?”, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्या मंत्रालयात अजित पवार यांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. या भेटीबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, “सुप्रिया सुळे यांनी घेतलेली भेट ही कामासाठी होती”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :
पार्थ पवार सुप्रिया सुळेंच्या भेटीला सिल्वर ओकवर, शरद पवारांचीही भेट घेण्याची शक्यता
नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला
पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार