मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं भासत असल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौतने केलं. कंगनाच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Minister Nitin Raut ask question to Kangana Ranaut).
“कंगना रानौत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?”, असा प्रश्न मंत्री नितीन राऊत यांनी ट्विटरवर विचारला (Minister Nitin Raut ask question to Kangana Ranaut).
कंगना रानावत म्हणते, “मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते”. अभिनयाच्या क्षेत्रात ‘रन-आउट’ होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला? https://t.co/suaMDvPdJk
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) September 3, 2020
कंगना नेमकं काय म्हणाली?
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा परतू नये असं म्हटलं होतं. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”, असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला आहे.
कंगनाने याआधी मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. भाजप आमदार राम कदम यांनी ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कंगनाला सुरक्षा देण्याची विनंती केली होती. कंगना बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांसंबंधित माहिती देण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी तिला सुरक्षा द्यावी, अशी मागणी राम कदम यांनी ट्विटरवर केली होती.
राम कदम यांच्या ट्विटला उत्तर देताना कंगनाने मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलं. “माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी”, असं कंगना रनौत म्हणाली होती.
Thank you for your concern sir, I am actually more scared of Mumbai police now than movie mafia goons, in Mumbai I would need security either from HP government or directly from the Centre, No Mumbai police please ? https://t.co/cXEcn8RrdV
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2020
निलेश राणेंकडून कंगनाला प्रत्युत्तर
मुंबई पोलिसांची भीती वाटते या वक्तव्यावरुन निलेश राणे यांनीदेखील कंगनाला सुनावले आहे. “दोन-तीन अधिकारी प्रेशरमध्ये आले, म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्याइतकी राणावत (कंगना रनौत) कोण लागून गेली? अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत, पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही” असा इशारा निलेश राणे यांनी कंगनाला दिला.
2/3 अधिकारी प्रेशर मध्ये आले म्हणजे संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट दोषी होत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांवर अभिमान आहे. मुंबई पोलिसांवर बोलण्या इतकी राणावत कोण लागून गेली?? SSR आणि सालियान प्रकरणात खरे आरोपी पकडण्याच्या समर्थनात आम्ही आहोत पण आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 3, 2020
संजय राऊतांकडूनही उत्तर
कंगनाने मुंबई पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं होतं. “जर महाराष्ट्रातील व्यक्ती हिमाचल प्रदेशमध्ये राहत असेल आणि ती व्यक्त जर असं म्हणत असेल की माझा शिमला पोलिसांवर विश्वास नाही. जर विश्वासच नाही, तर शिमलामध्ये राहू नको, असे संजय राऊतांनी सांगितले.
तुम्ही तिथं राहता, खाता, कमवता, ओळख मिळवता आणि शिमला पोलिसांवर थुंकता. मग हा काय तमाशा आहे. जर मी या राज्यात राहतो, तर माझा अधिकार आहे, पोलिसांसोबत संवाद ठेवण्याचा, असेही राऊत म्हणाले.
जर मला काही समस्या असेल तर त्यांना सांगेल. कुणीही व्यक्ती मुंबई पोलीस, राज्य सरकार यांच्याविषयी बोलते. हे बरोबर नाही. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना आवाहन करतो की, जे लोक मुंबई पोलिसांविषयी वाईट बोलत आहेत आणि राज्यातील जे राजकीय पक्ष अशा व्यक्तींचं समर्थन करत आहेत, अशांविरुद्ध कारवाई करावी,” असं राऊत म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती, केंद्र सरकारने सुरक्षा द्यावी : कंगना
कंगना ड्रग्जशी संबंधित नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार, सरकारकडून सुरक्षा का नाही? : राम कदम