नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी काल (30 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या 57 सहकारी मंत्र्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश झाला. यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. रामदास आठवले यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नव्हती, तरीही त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केलं. मात्र, एकही खासदार नसताना केंद्रात मंत्रिपद कसं मिळालं, याचं गुपित स्वत: रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना फोडलं आहे.
“मंत्रिपद दुसऱ्यांना मिळण्याचे गुपित म्हणजे मी नरेंद्र मोदींच्या प्रत्येक सभेला उपस्थित होतो. मोदी म्हणायचे की, फडणवीस तुमच्यावर खुश आहेत आणि फडणवीस म्हणायचे की, मोदी तुमच्यावर खुश आहेत. मी म्हणायचो तुम्ही दोघे खुश तर मीही खुश.” असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना सांगितले. तसेच, मी मंत्रिपद मिळावे म्हणून यंदा कुणाला भेटलो नाही, सहज मिळाले, असेही सांगायला आठवले विसरले नाहीत.
“रिपब्लिकन पक्षाला दुसऱ्यांदा संधी मिळाली. मी आनंदी आहेच. त्याचप्रमाणे माझे कार्यकर्तेही आनंदी आहेत. आता आनंद साजरा करुन चालणार नाही. जे खाते मिळेल त्याचे सोने करणार आहे. सामजिक ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर.”, असे यावेळी रामदास आठवेल म्हणाले. मात्र, “कोणतं खात द्यायचं, तो अधिकार पंतप्रधानांचा आहे. मला जी जबाबदरी सोपवतील ती पार पाडेन. माझा मंत्रिपदाचा अनुभव त्यामुळे दुसऱ्यांदा संधी मिळाली.” असेही आठवले म्हणाले.
वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ 7 नेत्यांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपदं
माझ्या मंत्रिपदाचा उपयोग पक्षाचे संघटन बांधण्यासाठी करणार आहे, असे म्हणत रामदास आठवले पुढे म्हणाले, “वंचित आघाडीला मते चांगली मिळाली. पण निवडून येण्यासाठी डबल मते लागतात. वंचितने वंचितचे काम करावे, मी माझा पक्ष बांधण्याचे काम करणार आहे. सामाजिक चळवळ म्हणून पक्ष चालवत असल्याने माझे नुकसान होत आहे. मला स्वतःच्या बळावर पक्ष उभा करावा लागेल. सगळ्या जातीची मते मिळवणारे उमेदवार शोधावे लागतील. सर्व निवडणुकांमध्ये उमेदवार जिंकून आणावे लागतील.”
VIDEO : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रामदास आठवलेंची पहिली एक्स्क्लुझिव्ह मुलाखत :