सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा : सुभाष देसाई
भाजपकडून 22 मे रोजी म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात 'माझं अंगण, माझं रणांगण' अशा स्वरुपाचं आंदोलन केलं जाणार आहे. याच आंदोलनावरुन सुभाष देसाई यांनी भाजपवर टीका केली (Subhash Desai slams BJP).
मुंबई : “भाजपला दोषच शोधायचे असतील तर सुरतमध्ये मजुरांचा असंतोषाचा भडका उडाला आहे (Subhash Desai slams BJP). भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना तो भडका शमवण्याचा सल्ला द्यावा”, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले आहेत. भाजपकडून 22 मे रोजी म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारविरोधात ‘माझं अंगण, माझं रणांगण’ अशा स्वरुपाचं आंदोलन केलं जाणार आहे. याच आंदोलनावरुन सुभाष देसाई यांनी भाजपवर टीका केली (Subhash Desai slams BJP).
“‘पार्टी विथ डिफरन्स’ असं बोलणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारविरोधात आपल्या कार्यकर्त्यांना 22 मे या तारखेला ‘माझं अंगण, माझं रणांगण’ असं आंदोलन करण्यास सांगितलं आहे. हा निव्वळ एक स्टंट आहे”, असा टोला सुभाष देसाई यांनी लगावला.
“मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात सर्व विरोधी पक्षांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी असंतोष न दाखवता काही सूचना केल्या होत्या. राज्य सरकारने त्या सूचना अंमलातदेखील आणल्या. मग आताच हा स्टंट का?”, असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केला.
“राज्याची जनता, सरकार आणि प्रशासन सध्या कोरोनाविरोधात लढत आहेत. कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ते झटत आहेत. कार्यकर्त्यांनी या परिस्थितीत आंदोलन करण्यापेक्षा जनतेशी संवाद साधून दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. जनतेच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न कारावा”, असा सल्ला सुभाष देसाई यांनी दिला.
“आज आमचा शिवसैनिक समाजाला मदत करतोय, धीर देतोय. तसं काम केलं तर जनता कार्यकर्त्यांना डोक्यावर उचलून घेईल. पण तसं न करता भाजप केवळ प्रसिद्धिसाठी आंदोलन करत असेल तर त्यांची दिशाभूल झाली आहे. भाजपची दिशा चुकली आहे”, असं सुभाष देसाई म्हणाले.
“विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या परिस्थितीत आधी कोरोनाविरोधात एकत्र लढू, नंतर राजकारण करु, असं सांगितलं पाहिजे. राजकारणाचीदेखील एक वेळ असते. ही वेळ राजकारणाची नाही. विधानसभेच्या निवडणुकीला साडेचार वर्ष बाकी आहेत”, असं सुभाष देसाई म्हणाले.
“देवेद्र फडणवीस आपली जबाबदारी नेहमी योग्यप्रकारे पार पाडतात. त्यामुळे ते सध्याच्या परिस्थितीतही आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडतील. चुकीच्या गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांचा वेळ आणि शक्ती वाया न घालवता ते खांद्याला खांदा लावून पक्षभेद न करता लढतील, असा मला विश्वास आहे”, असं सुभाष देसाई म्हणाले.
संबंधित बातम्या :
कोरोना संकटात माजी अधिकाऱ्याने खजाना दाखवला, ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटी मिळणार?