रवी राणा यांची जाहीर दिलगिरी, शब्द मागे घेतले, पण बच्चू कडू म्हणतात, उद्याच…
वाद नको व्हायला हवा होता. मी वाद घडवून आणला नाही. जे काही आरोप केले ते राणांनी केले. काही लोक म्हणतात मी वाद केला. मी वाद केला नाही. समोरून बोललं गेलं.
मुंबई: आमदार बच्चू कडू आणि रवी राणा (ravi rana) यांच्या वादावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा वाद मिटला आहे. खुद्द आमदार रवी राणा यांनी हा आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं सांगत हा वाद संपल्याचं म्हटलं आहे. राणा यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही बच्चू कडू (bacchu kadu)यांनी आपले शब्द मागे घेतले नाही किंवा हा वाद मिटल्याचं स्पष्टपणे सांगितलं नाही. आज कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बच्चू कडू काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यांनी प्रकरण चांगलं हाताळलं. त्यांचे आभार मानतो. पण माझ्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहे. आज संध्याकाळी पूर्णाला 6 वाजता कार्यकर्त्यांशी चर्चा करू. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ. उद्या 12 ते 1 वाजता आमचा कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आहे. महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते येणार आहेत. तेव्हाच आमची भूमिका स्पष्ट करू, असं बच्चू कडू म्हणाले.
कार्यकर्ताच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. माझा आत्मा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे त्यांना विचारून उद्या निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.
वाद नको व्हायला हवा होता. मी वाद घडवून आणला नाही. जे काही आरोप केले ते राणांनी केले. काही लोक म्हणतात मी वाद केला. मी वाद केला नाही. समोरून बोललं गेलं. आरोप केल्यानंतर मी गप्प बसलो असतो तर तिकडूनही माझ्यावर आरोप झाले असते. मला बदनाम केलं असतं. त्यामुळे मी अयोग्य केलं किंवा वाईट केलं असं वाटत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
वादातच आयुष्य घालवायचं का हा विषय नाही. वैयक्तिक गोष्टीत शक्ती वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक कामात शक्ती वापरणं योग्य आहे, असं मला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.
बच्चू कडू यांना बदनाम करण्याचा डाव होता का? या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. त्याबद्दल पूर्ण माहिती घेतल्या शिवाय बोलणार नाही. अंधारात झोडपा मारणं किंवा डोळयाला पट्टी लावून वार करणं चुकीचं होईल, असं ते म्हणाले.
वाद करणं हे मलाही पटत नाही. महाराष्ट्राला टांगणीला धरणं योग्य नाही. पण माझ्यावरील आरोपच तसे होते. त्यामुळे मला भूमिका घ्यावी लागली. आता राणांचं स्टेटमेंट असेल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे म्हणाले ते कार्यकर्त्यांसमोर मांडेन. आणि आमची भूमिका स्पष्ट करू, असंही त्यांनी सांगितलं.